आल्हाददायी हवी वेशभूषा – भाग ७

“आयुष्याच्या रेशीमवाटा” : भाग ७
आल्हाददायी हवी वेशभूषा
चंचलता हा मानवी स्वभावाचा अटळ व जन्मजात गुण आहे. अगदी लहानग्या बाळाची नजरदेखील एका खेळण्यावर जास्त काळ स्थिरावू शकत नाही. थोड्या वेळापूर्वी हवीहवीशी वाटणारी वस्तू त्याला थोड्या वेळानंतर नकोनकोशी वाटायला लागते. दुसरे संपले कि तिसरे आणि तिसरे संपले कि चवथे असे दृष्टिभ्रमण अव्याहत सुरू असते. स्वभावातील ही चंचलता ज्ञानेंद्रियांसोबत अवयवांनासुद्धा सतत हालचाल करण्यास प्रेरित करत राहते.
मनुष्य एका जागेवर शांत बसला तरी निर्जीव पुतळ्यासारखा शांत बसू शकत नाही. डोळ्यांच्या मिचमिचण्यासह अवांतर शरीराच्या हालचाली अखंडपणे सुरू राहतात. कुणीकुणी तर बसल्याजागी एक किंवा दोन्ही पाय इतक्या जोरजोराने हलवत राहतात की शेजारच्या व्यक्तीला ते नको-नकोसे होते. मनुष्याच्या अंगात चंचलता इतकी एकजीव झालेली असते की ध्यानधारणा व एकाग्रचित्त करण्यासाठी त्याला काही काळ त्याचा सराव करावा लागतो. मनाची चंचलता माणसाला वेगवेगळे व नवनवे प्रयोग करण्यास बाध्य करते. प्रयोगशील आनंददायी प्रवासातूनच फॅशनचा जन्म होतो. फॅशनच्या नावाखाली धुडगूस घातला जातो, असे अनेकांचे मत असले तरी ते पूर्णसत्य नसते. फॅशनलासुद्धा शास्त्रीय आधाराचा पाया असतो. अशास्त्रीय असेल ते फार काळ टिकत नसते आणि शास्त्रीय आधार असेल तर ते कुणाच्या आडकाठीने रुजायचे थांबत नसते. संस्कृती कितीही थोर असली तरी ती जशीच्या तशी अनंतकाळापर्यंत स्वीकारत राहणे तर केवळ अशक्य असते. भौगोलिक स्थितीनुसार परिस्थिती बदलत असते आणि परिस्थितीनुसार जीवनशैली बदलत असते. परिस्थितीनुसार वेशभूषा करून आल्हाददायी किंवा सुसह्य जीवन जगण्याकडे मनुष्याचा स्वाभाविक कल असल्याने संस्कृतीच्या व्याख्याही लवचिक असल्या पाहिजेत.
ज्या भौगोलिक प्रदेशात कडाक्याची थंडी, रणरणते ऊन किंवा भरपूर पर्जन्यवृष्टी असते, तिथे जास्तीतजास्त जाडेभरडे व सर्वांग झाकणारी वेशभूषा आल्हाददायी असते. याउलट समुद्रकिनारी दमट वातावरणात कमीतकमी अंग झाकणारी व हवा खेळती असणारी वेशभूषा आल्हाददायक ठरत असते. पण कमीत कमी कपडे घालणे (विशेषतः स्त्रियांनी) म्हणजे भारतीय प्राचीन संस्कृतीवर हल्ला होतो असे संस्कृतीरक्षकांचे मत असल्याने व तशी समाजमान्यता असल्याने वेशभूषेच्या बाबतीत व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होतो. पण मग जे एकट्यादुकट्याला शक्य नाही ते सामूहिकपणे ‘फॅशन’च्या नावाखाली होत असते. तीच जीवनशैली विकसित होत जाते. एरवी ती फॅशन नसून आवडलेली उपयुक्त सोयीची आनंददायी जीवनशैलीच असते.
फक्त डोळे सोडून उर्वरित चेहरा पूर्णपणे झाकला जाईल असा महिलांनी रुमाल बांधलेला बघून अनेक लोक नाक मुरडतात. यामागे काहीतरी काळंबेरं वर्तन असल्याचे वाटून अनेकांच्या भुवया उंचवायला लागतात. या प्रकाराकडे काही लोक फॅशन म्हणून, तर काही लोक फॅड म्हणून बघतात. वस्तुस्थिती मात्र त्यापेक्षा निराळी असते. प्रखर ऊन किंवा कडाक्याच्या थंडीपासून कोमल त्वचेचे संरक्षण करणे, असा यामागे उद्देश असतो. वेगवान हवा विरुद्ध दिशेने वाहत असेल तर ताशी ६० किलोमीटर वेगाने बाइक चालवताना चालकाला हवेचे असह्य चटके बसतात. हा सर्व बाइकचालकांचा स्वानुभव असतो. पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांची त्वचा कोमल आणि नाजूक असते, हेसुद्धा सर्वमान्य असते. पण इतरांमधले दोष शोधताना माणसाला स्वतःच्या अनुभूतीचाही विसर पडतो. त्यातूनच मग वस्तुनिष्ठ विचार करण्याऐवजी तर्ककुतर्क व संशयाचे भूत माणसाच्या मनात थैमान घालायला सुरुवात होते. ठिकठिकाणी फाटलेली पॅन्ट (भिकाऱ्यासारखी?) व मोठ्या आकाराची जागोजागी छिद्र असलेली शर्ट जर सर्वांगाला खेळती हवा पुरवत असेल तर अशा पोशाखाची चेष्टा होण्याऐवजी समर्थनच केले पाहिजे.
खेड्याकडून जावे शहराकडे जसे
आकार घटत चोळी, जाते सरासरी
हवामानातील बदलाचा जसा मानवी शरीरावर प्रभाव पडतो, अगदी तसाच आर्थिक संपन्नतेचा प्रभावही मानवी शरीरावर पडत असतो. आर्थिक संपन्नतेच्या आलेखानुरूप माणसाची गरमी वाढत जाते, तसतसा कपड्याचा आकार घटत जातो. गरिबीने मानवी शरीराचा गारठा वाढत जात असल्यामुळे अंगावरील कपड्याचा आकारही वाढत जातो. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक व्यक्ती आल्हाददायी जीवन जगण्याच्या रेशीमवाटा धुंडाळतच असतो आणि त्यात सफलही होत असतो.
– गंगाधर मुटे आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन “आयुष्याच्या रेशीमवाटा”

भाग ७ – दि. ७ मार्च, २०२० – “आल्हाददायी हवी वेशभूषा”

==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी *fr* http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s