एक लेख एका आत्मप्रौढीचा!
आत्मस्तुती किंवा आत्मगौरव मानवी जीवनात निषिद्ध मानल्या गेला आहे. स्वत:च स्वत:चे कौतूक करणे तर अशोभनीयच. अगदी ग्रामीण जनजीवनात सुद्धा अशा वर्तनाला “अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणे” अशा वर्गवारीत ढकलले गेले आहे. अगदी आत्मचरीत्र लिहायचे असेल तरी लेखकाने आपल्या आयुष्यातील बर्या-वाईट दोन्ही प्रकारच्या घटनांचा उहापोह करावा, अशी अपेक्षा असते. पण तरीही आयुष्यात कधीकधी अनपेक्षितपणे असाही प्रसंग येतो की आपलाच आपल्याला अभिमान वाटायला लागतो. आपण सहज म्हणून केलेले कार्य अनपेक्षितपणे अपेक्षेबाहेरची फ़लनिष्पती देऊन जाते. अशावेळी आपलाच आपल्याला वाटणारा अभिमान अहंकार नसतो. त्यामागे असते केवळ आपल्या हातून घडलेल्या कार्याची कृत्यकृत्यता आणि श्रमसाफ़ल्यता.
अशाच एका प्रसंगाविषयी आज लिहायचा मोह न आवरल्यामुळे आत्मस्तुतीचा दोष स्विकारुन मी लिहित आहे.
“मुटे सर, साहेबांच्या प्रकृत्तीबद्दल काही कळले का?”
“ नाही. यासंदर्भात ताजी माहिती माझ्याकडे नाही” मी.
“सरोजताई, साहेबांच्या प्रकृत्तीबद्दल काही कळले काय?” मी.
“माझं काल रात्रीच बोलणं झालं प्रकृती………”
मी मध्येच सरोजताईंचे बोलणे थांबवून म्हटले.
“आज काहीतरी विपरित बातमी आहे, तुम्ही तातडीने पुण्याला संपर्क करावा”
आता रडण्याखेरीज अन्य काही कार्य उरलेलेच नव्हते. बातम्या अजून सुरु व्हायच्या होत्या. निदान आणखी दोन तास तरी ही बातमी अधिकृतपणे जाहीर होण्याची व प्रसारमाध्यमांपर्यत पोचण्याची शक्यता नव्हती. बातमी अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना आणि वृत्त वाहिन्यांना शरद जोशींविषयीची माहीती, जीवनपट, छायाचित्र आणि व्हिडियो लागतील. ही सर्व माहिती प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देऊ शकेल असे शेतकरी संघटनेकडे एकच व्यक्तिमत्व होते आणि ते म्हणजे प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे. संघटनेच्या सुरुवातीपासूनच म्हात्रे सरांनी केंद्रीय कार्यालय सांभाळले आहे. पण याक्षणाला ते माहिती पुरवायला नक्कीच उपलब्ध होऊ शकणार नव्हते. शिवाय शरद जोशींच्या प्रकृतीची बातमी प्रसारमाध्यमांपासून लपवून गोपणीयता राखल्याने प्रसारमाध्यमेही बेसावध असल्याने ऐन वेळेवर माहिती गोळा करणे त्यांनाही शक्य होणार नाही, याचाही नीटसा अंदाज येऊन गेला.
शरद जोशींच्या अत्यवस्थेविषयी कार्यकर्त्यांनाही फ़ारशी माहिती नसल्याने ही बातमी महाराष्ट्रासहित अन्य राज्यातील शेतकर्यांनाही धक्का देणारी असल्याने या बातमीचे महत्वही अनन्यसाधारणच होते. आता यासंदर्भात जे काही करायचे ते आपल्यालाच करायला हवे असे ठरवून तातडीने लॅपटॉपवर बसलो आणि महाराष्ट्रासहित देशातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांना आणि दुरदर्शन वाहिन्यांना इमेलद्वारे माहीती पाठवायचा सपाटा सुरू केला.
तीन-चार इमेल जाईपर्यंत ठीक होते पण जेव्हा एकापाठोपाठ शरद जोशींविषयीची संपूर्ण माहिती, जीवनपट, आंदोलनाचा आढावा, छायाचित्र व व्हिडियो असलेले दहा-बारा इमेल त्यांचेकडे पोचले तेव्हा पत्रकारांना संशय येऊन काहीतरी नक्कीच वाईट बातमी असल्याचा त्यांनाही अंदाज येणे क्रमप्राप्त होते. मग माझा मोबाईल खणखणायला लागला. पुण्यावरून अधिकृत घोषणा न झाल्याने मी पत्रकारांना बातमीच्या सत्यतेचा दुजोरा देऊ शकत नव्हतो. मग मोबाईल मित्राच्या हाती दिला आणि सांगीतले की कॉल करणार्या सर्वांना सांग की मी सध्या अतिव्यस्त आहे त्यामुळे त्यांनी एक तासानंतर संपर्क करावा. मी मात्र माहितीचे इमेल पाठवणे सुरुच ठेवले.
मी पाठवत असलेल्या माहितीचा बाज लक्षात घेता बहुधा प्रसारमाध्यमांनाही पुरेसा अंदाज येऊन गेलेलाच असावा कारण मी फ़ोनवर उपलब्ध नाही म्हटल्यावर तिकडून इमेलवर रिप्लाय यायला लागलेत. रिप्लायला प्रतिसाद न देता मी नवीन माहिती पाठवणे सुरुच ठेवले. त्याचा परिणाम असा झाला की अधिकृत घोषणा होताच दूरदर्शन वाहिन्यावर थेट सविस्तर बातम्याच सुरू झाल्यात. पुण्यापासून ८०० किलोमिटर अंतरावरील आर्वी छोटी सारख्या दुरवरच्या ग्रामीण भागातील ३००० लोकसंख्या असलेल्या गावात बसून मी दिवसभर राज्यभरातल्या कानाकोपर्यातील प्रसारमाध्यमांना हवी ती माहिती आणि साहित्य पुरवत होतो, ही आधुनिक संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञानाची किमया होती आणि मी त्या अत्याधुनिक नवतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेत होतो. दिवसभर दूरदर्शन वाहिन्यावर आणि १३ तारखेच्या राज्यभरातील वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यामध्ये ५० ते ९० टक्के मजकूर मी पाठवलेलाच दिसत होता किंवा मीच चालवत असलेल्या http://www.sharadjoshi.in व http://www.baliraja.com या संकेतस्थळावरुन तरी घेतलेला होता. शरद जोशींचा जीवनपट तर जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांनी मी जसा पाठवला तसाच्या तसाच छापला होता.
माझ्या एका छोट्याशा प्रयत्नाने व मी निर्माण करून ठेवलेल्या संकेतस्थळांमुळे शरद जोशींसारख्या युगात्म्याचे व्यक्तीमत्व सविस्तर माहितीसह जनतेपर्यंत पोहचू शकल्याने श्रमसाफ़ल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटून अभिमानास्पद वाटणे अगदीच स्वाभाविक आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
साप्ताहिक उदयकाळ “चैत्र विषेशांक-२०१७” मध्ये प्रकाशित.
Very nice