खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल
हसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने
प्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने
दोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू
तृप्तीसवे करावा हनिमून माणसाने
रागिष्ट रागिणीला देऊन सोडचिठ्ठी
शांतीसही बघावे बिलगून माणसाने
माया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा
लागू नयेच नादी उमजून माणसाने
करपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया
सुमतीस वश करावे रिझवून माणसाने
आसक्त कामिनीची छाया पडू न द्यावी
दीप्तीसमेत ज्योती विझवून माणसाने
रति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे
मुक्तीकडे निघावे हरखून माणसाने
– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(मराठी मातीला खट्याळरसाचे वावगे नाही. नास्तिकांना आवडेल अशी भाषाशैली वापरून आस्तिकभाव त्यांचेपर्यंत पोचवण्यासाठी संतांनी खट्याळरसाचा उपयोग खुबीने केलेला आहे. त्याचे पुरावे संतसाहित्यात सापडतात. गझल या विदेशीसंस्कृतीचा पदर लाभलेल्या काव्यप्रकाराला मराठी मातीचा सुगंध देण्याचा हा एक प्रयत्न.)