मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व
“मुरली खैरनार गेलेत” असा प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे सरांकडून आलेला sms वाचताच माझ्याच मुखातून शब्द बाहेर पडले “हे राम!”
जीवन क्षणभंगुर असते आणि आयुष्याची दोरी ओढून घेण्याचा काळाचा अधिकार मान्य केला तरी काळाने एवढे निष्ठुर वागायला नको असे राहून राहून वाटत आहे. विश्वासच बसत नाही की मुरली खैरनार आपल्यात नाहीत आणि तशी नोंद लिहायला मेंदूसुद्धा तयारच होत नाही आहे. माझ्या व्यक्तीगत आयुष्यावर प्रभाव टाकणारी जी काही बोटावर मोजण्याइतकी नावे आहेत, त्यातील एक नाव म्हणजे जिंदादील व्यक्तिमत्त्व असलेले मुरली. माझ्या भाग्याने माझ्या दैनंदिनीत काही सोनेरी व कधीच न पुसली जाणारी पाने लिहून ठेवली त्यातला एक अध्याय म्हणजे मुरली खैरनारांचा मला लाभलेला सहवास.
शेतकरी संघटनेवर आणि मा. शरद जोशींच्या विचारावर अपार श्रद्धा असलेले मुरली विनोदी होते, मिश्किल होते, हजरजबाबी होते आणि गंभीरही होते. उच्च दर्जाचे पत्रकार, उत्तम वक्ता आणि नाटयकलावंत, दिग्दर्शकही होते. मनमिळाऊ होते पण सहकार्यांकडून कार्यक्षमतेने काम करवून घेण्याची विशेष खुबी त्यांच्यामध्ये होती. ते कुशल संघटकही होते. स्वत:च हजरजबाबी असल्याने ते मिश्किलपणे इतरांवर शाब्दिक कोटी करायचे तर कधी कधी सहकार्यांची फिरकी घ्यायचे. स्वत:ची फिरकी घ्यायची संधी ते दुसर्याला कधीच मिळू देत नसत. त्यांच्यापेक्षा मी वयाने बराच लहान असूनही त्यांनी मला कायमच बरोबरीच्या मित्राइतका दर्जा दिला त्यावरून त्यांच्या विनयशीलतेचाही अंदाज येतो. कायम बोलत राहणे, नवनव्या छोट्यामोठ्या कथा, विनोदी चुटकूले रचून ऐकवत राहणे हा त्यांच्या स्वभावातला स्थायीभाव होता.
तेव्हा नाशिकच्या शरणपूर रोडवर कार्यालय होते. रात्री नऊ वाजेपर्यंत काम करायचे व नंतर जेवायला जायचे असा आमचा नित्यक्रम होता. आमच्या चमूमध्ये मिलिंद मुरुगकर, स्व. जीवन टिळक, धर्मेंद्र चव्हाण, वसंत विसपूते होते. नऊ वाजले की सर्व आपापल्या घरी जेवायला जायचे व मी भोजनालयात जायचो. एक दिवस मोठा मजेदार प्रसंग घडला. त्यांची फिरकी घ्यायची नामी संधी मला साधून आली आणि मी त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. त्यांची पत्नी सौ. मृणालिनी यांची एल.एल.बी ची परीक्षा सुरू असल्याने त्या सायंकाळी लवकरच आपला स्वयंपाक उरकून घ्यायच्या आणि अभ्यासाला लागायच्या. त्या दिवशी मुरलींना बहुतेक फारच कमी भूक असावी म्हणून त्यांनी विचार केला असेल की यालाही जर भूक कमी असेल तर एकाच्या डब्यात दोघांचे जेवण सहज होऊ शकते. याचा भोजनालयात जाऊन जेवणाचा खर्चही वाचेल. म्हणून त्यांनी मला सहजपणे विचारले.
“तुला आज किती भूक आहे?”
मला प्रश्नाचा रोखच कळला नाही म्हणून मी सुद्धा ठोकून दिले.
“आज मला भूकच नाहीये. फार तर एखादी पोळी. एखादी पोळी खूप झाले.”
त्यावर ते लगेच मला म्हणाले.
“अच्छा! मग चल माझ्यासोबत घरी जेवायला”
घरी पोचलो तेव्हा मृणालिनीताई अभ्यासात गर्क होत्या पण माझा आवाज ऐकताच बाहेर आल्या आणि मला स्मित करून लगेच स्वयंपाकगृहात गेल्या. मृणालिनीताई म्हणजे त्यावेळच्या शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या धडाडीच्या नेत्या. त्यामुळे त्यांची माझी ओळख मुरलींच्याही आधीची. घरी पाहुणा जेवायला आला म्हटल्यावर त्यांनी लगेच वाढीव स्वयंपाक केला आणि झाली जेवणाला सुरुवात. आज मस्तपैकी नाटक वठवायचे आणि फिरकी घेऊन मुरलींची जेवढी करता येईल तेवढी फजिती करायची असा ठाम निश्चय करून अत्यंत गंभीर मुद्रेने जेवायला बसलो. पहिली पोळी संपताच मी म्हणालो,
“झाले माझे जेवण”
“अरेव्वा! एका पोळीत जेवण आटोपले? असं काय करताहात?” असे म्हणत मृणालताईंनी दुसरी पोळी ताटात घातली. मी दुसरी पोळी खायला सुरुवात केली आणि म्हणालो,
“त्याचं असं आहे की, माझं आणि मुरलीचं एक अॅग्रीमेंट झालंय. एकच पोळी खाण्याच्या करारावरच त्यांनी मला जेवायला बोलावले आहे”
ऐकताच मृणालताई जाम भडकल्या मुरलीवर. मुरली समजावण्याच्या स्वरात मृणालताईंना खूप समजावीत होते,
“अगं हा वात्रट आहे, तुला माहीत आहे ना? हा वात्रटपणा करतो आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता”
“जेवणात कुठे आलाय वात्रटपणा? तुला किती भूक आहे, असे कधी कुणाला विचारले जात असते काय? आमच्या विदर्भात नाही बुवा अशी पद्धत!”
१९८७ च्या सुमारास ‘आठवड्याचा ग्यानबा’ बंद पडले आणि मुरलींशी संपर्क जवळजवळ तुटलाच आणि कधी पत्रव्यवहार तर कधी फोनवर बोलणे इतक्यापुरताच मर्यादित झाला.
“बोला, कसं काय येणं केलंय? काय काम काढलंत?”
“तू मला आता ओळखणार नाहीस, आपण भेटून २० वर्षे…….”
आणि मी जागेवरच उडालो. डोळे विस्फारून आश्चर्यतिरेकाने किंचाळलोच
“मुरलीभौ ????”
आज मला पुन्हा माझ्याच काही ओळींची परत आठवण झाली.
काही संदेश नसतातच….. वाचण्यासारखे
काळजात जाऊन रुततात…. टाचण्यासारखे
सांत्वनाही जिथे ओशाळल्यागत होते….
सारेच घाव नसतात जेव्हा…. सोसण्यासारखे
काही जाऊन रुततात, आत खोलवर….
सारेच व्रण कुठे असतात…. दिसण्यासारखे?.
डोळे बधिर अन अश्रू मुके व्हायला लागतात…..
सारेच नसते शब्दात….. सांगण्यासारखे
टाळायचे म्हटले तरी काही टळत नाही……
घडते तेच नियतीला मंजूर…. असण्यासारखे
निश्चयाने झेलत जावा येणारा प्रत्येक क्षण…..
आणखी असतेच काय ‘अभय’ ….. असण्यासारखे?
भगवंत देवो तुम्हांस सुख आणि शांती
हेच शब्द माझे प्रार्थनेसारखे…….!
देव त्यांच्या आत्म्यास सुख आणि शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा आघात सोसण्याचे बळ देवो, एवढीच प्रभुचरणी प्रार्थना करतो.
– गंगाधर मुटे
ranmewa@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
खूप छान लीहता सर आपन.रानमोगरा आवडला. आणि भावली ती कवीता” सुंदर ते ध्यान….।