पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत

पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत

                कांदा आणि बटाटा या शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून मुक्तता करणे, “पिकलं तवा लुटलं, म्हणून देणंघेणं फ़िटलं” हे तत्व स्विकारून शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि राज्यात विलंबाने व अपुरा पाऊस झाल्याने राज्यातील शेतकर्‍यांवर ओढवलेल्या संकटाची भिषणता लक्षात घेता शेतीवरील वीजपंपाची संपूर्ण वीजबील मुक्ती या प्रमूख तीन मागण्या ऐरणीवर आणून केंद्र सरकारला शेतकर्‍यांच्या आसूडाचा हिसका दाखविण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे दिनांक ४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी १ तासाचे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी यांनी केले.

 सुमारे ३००० शेतकर्‍यांनी मुंबई-आग्रा हायवेवर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजुची वाहतुक पूर्णत: ठप्प झाली होती.

                तत्पुर्वी पिंपळगाव बसवंत येथील शगून मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतीसमोरिल समस्यांवर सविस्तर उहापोह करण्यात आला. सभेत देविदास पवार, अर्जूनतात्या बोराडे, निर्मलाताई जगझाप, तुकाराम बोबडे, अनिल घनवट, शैलजा देशपांडे, रवी देवांग, सरोज काशीकर, रामचंद्रबापू पाटील, गुणवंत पाटील हंगरगेकर, अड वामनराव चटप आणि शरद जोशी यांनी मार्गदर्शन केले.

                शेतीत चांगले उत्पादन झाले तर सरकार हमी भावाने खरेदी करण्यास पुढे येत नाही व शेतकर्‍यांना संरक्षण देत नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना आपला माल मिळेल त्या किमतीत मातीमोल भावाने विकावा लागतो. मात्र कमी उत्पादन झाले आणि बाजारपेठेत तेजी यायला लागली की सरकार निर्यातबंदी करून किंवा निर्यातशुल्क वाढवून स्थानिक बाजारपेठेतील भाव पाडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करते. त्यामुळे दोन्ही स्थितीमध्ये शेतकरीच नाडवला जातो व उत्पादनखर्च भरून न निघाल्याने त्याच्यावरचा कर्जाचा डोंगर आणखी वाढत जातो. शेतीवरील कर्ज हे शासकीय धोरणाचा परिपाक असून शेतीवरील कर्ज शासननिर्मित संकट आहे.

                दुर्धर रोगांवर नियमित घ्यावयाच्या औषधी महागड्या असतात व सर्वसामान्य माणसाच्या क्रयशक्तीच्या आवाक्याबाहेर असतात. गोरगरिबांना वेळेवर औषधोपचार मिळाले नाही तर माणसे दगावतात आणि तरीही औषधांचा समावेश जीवनावश्यक कायद्यात केला जात नाही; याउलट कांदा आणि बटाटा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा न खाल्याने कोणीच मरत नाही किंवा जीव कासाविसही होत नाही तरी सुद्धा कांद्याला जीवनावश्यक वस्तू कायद्यात टाकल्या गेलेले आहे. कांदा स्वस्त झाला पाहिजे म्हणून सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करते. यंदा कांद्यावरील निर्यातशुल्क केंद्रसरकारने प्रति टन शुन्य डॉलवरून ३०० डॉलर आणि ३०० डॉलरवरून ५०० डॉलर प्रति टन वाढवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची मागणी संपली असून निर्यातीत ९० टक्के एवढी घट आली आहे, परिणामत: देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याचे भावही गडगडले आहेत.

सभेतील काही मुख्य निर्णय :

१) सभा संपताच तातडीने मुंबई-आग्रा हायवेवर रस्ता रोको आंदोलन

२) १४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी १ तासाचे लासलगाव येथे रेल्वे रोको आंदोलन करण्याचा निर्णय.

३) रेलरोको आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी करणार

४) १० नोव्हेंबर २०१४ रोजी किंवा त्या तारखेच्या आसपास नाशिक येथे शेतकरी संघटनेचे अधिवेशन

५) चलो दिल्ली कार्यक्रम अधिवेशनात जाहीर होणार

मुख्य क्षणचित्रे :

१) शेतकर्‍यांचा प्रचंड उत्साह पाहून उर्जा मिळालेल्या शरद जोशी यांनी बर्‍याच कालावधीनंतर माईकसमोर उभे राहून तब्बल १३ मिनिटे भाषण केले.

२) शेतकरी समाजात चैतन्य संचरणे हेच मा. शरद जोशींच्या प्रकृतीसाठी रामबाण आणि एकमेव औषध आहे, हेच या घटनेतून अधोरेखीत झाले.

३) शगून मंगल कार्यालयात प्रचंड शेतकर्‍यांनी उपस्थिती लावल्याने हॉल खचाखच भरला होता. जागेअभावी शेकडो शेतकर्‍यांना बाहेर उभे राहूनच भाषण ऐकावे लागले.

४) पावसाची सर आली तरी शेतकरी जागेवरच शांतपणे उभे होते.

५) रस्ता रोको आंदोलनाची घोषणा न करताच मा. शरद जोशींनी भाषण संपवले तेव्हा उपस्थितांमध्ये बराच हलकल्लोळ झाला. आत्ताच तातडीचा रास्ता रोको जाहीर करून आम्हाला रस्ता रोखून धरण्याची परवानगी द्या, अशा घोषणांनी शेतकर्‍यांनी सभागृह दणाणून सोडले.

६) उपस्थितांच्या भावनांचा आदर राखून मा. शरद जोशींनी तातडीचे १ तासाचे रास्ता रोको आंदोलन जाहीर केले.

                                                                                                              गंगाधर मुटे
                                                                                                महासचिव, स्वभाप, महाराष्ट्र प्रदेश

———————————————————————————————————————
 
Pimpalgaon Basawant
* * * * * * * *
Pimpalgaon Basawant
* * * * * * * *

Pimpalgaon Basawant

* * * * * * * *
Pimpalgaon Basawant
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *

Rasta Roko

* * * * * * * *

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s