शेतकर्‍याला अभय देणारी निराळी गझल

शेतकर्‍याला अभय देणारी निराळी गझल

“ग्रंथ हेच गुरू” असे म्हटले गेले आहे. ग्रंथ असंख्य आहेत पण शेतकर्‍यांच्या जीवनातील प्रश्न जाणून घेणारे, ते मांडणारे व त्यावर उपाय सांगणारे ग्रंथ दुर्मिळ आहेत. गझलकार कवी श्री गंगाधर मुटे यांचे “माझी गझल निराळी” हा गझलसंग्रह अशा दुर्मिळ पुस्तकापैकीच एक आहे.

शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे सुप्रसिद्ध लेखक श्री अमर हबीब यांचे भेटीसाठी अंबेजोगाईला गेलो होतो. त्यांनी आवर्जून मला हा गझलसंग्रह दिला आणि म्हणाले “सर, माझ्याकडे या गझलसंग्रहाच्या दोन प्रती आहेत. एक तुम्ही न्या, वाचा व कवीला तुमचा अभिप्राय कळवा”
मी लातूरला आलो आणि रात्री वाचायला सुरुवात केली. पहाटे चार वाजेपर्यंत मी वाचतच राहिलो. त्यात गुंतत गेलो कारण वाचताना ओळी मनाला भिडू लागल्या. टिपण काढत गेलो. दुसर्‍याच दिवशी अमर हबीब यांना फोन केला. पुस्तक वाचल्याचे आणि त्यावर टिपण काढल्याचे सांगितले आणि अत्यंत चांगले पुस्तक भेट दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानले.
माणसाचे जगणे केवळ स्वतःच्या मनावर, मर्जीवर अवलंबून नाही. सभोवतालची परिस्थिती अशी कठीण होत आहे की जगणे काय मरणेही कठीण झाले आहे. एवढेच नव्हे तर हसणे किंवा रडणे या मानवी मनाच्या नैसर्गिक प्रक्रिया ही माणसाच्या अधीन राहिल्या नाहीत. या परिस्थितीला शासन, शासनकर्ते व नोकरदार हेच जबाबदार आहेत, कारण “खाऊ लुटून मेवा” हे शासकांचे ब्रीद झालेले आहे. अर्थसंकल्पात असणारी जनसामान्यासाठीची तरतूद त्यांच्यापर्यंत पोहचतच नाही, त्याची विदारकता

अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे

या ओळीतून ठळकपणे मांडली आहे. शासनकर्ते निधीचे वाटपही समानतेने करत नाहीत. त्यामध्येही नागरी व गावठी असा भेद करतात. वास्तविक लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेल्या लोकशाही राज्यात शासक हे सेवक आहेत पण तेच मालक म्हणून मिरवू लागले आहेत.
जोपर्यंत समस्यांचे, प्रश्नांचे निदान नीट होणार नाही तोपर्यंत रोग नीट होणार नाही हे सत्य आहे.

तेच तेच रोग आणि त्याच त्याच औषधी
एकदा तरी निदान नीट व्हायला हवे

शेतकरी व त्यांचे प्रश्न याची जाण गझलकाराला आहे. प्रश्नाचे अचूक निदान कवीस आहे. हे प्रश्न का? कशामुळे व कोणी निर्माण केले याचेही भान आहे. या प्रश्नाची उत्तरेही त्याला माहीत आहेत. पण ते सोडवणे मात्र त्याच्या हातात नाही. फक्त संघर्ष करणे, लढणे आहे. या अफाट देशाचे राज्य दिल्लीच्या तख्तावरून चालते व तेथील वास्तवातील विसंगती कवीकडून दाखवली जाते.

लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला

याचा दुष्परिणाम शेतकर्‍याच्या आत्महत्येत होत आहे कारण राज्यकर्ते भेकड आहेत. ते स्वतः भेकड आहेत ते जनतेला काय अभय देणार? त्यामुळे मृत्यू सोकावलाय कारण त्याला शेतकर्‍याच्या रक्ताची चटक लागली आहे. निसर्गही शेतकर्‍याला साथ देत नाही कारण पाऊसही वेळेवर येत नाही. त्यामुळे कवी व्यथा मांडतो

भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला
उद्ध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला

शिवाय शेतकर्‍याला फक्त कोरडा उपदेशच केला जातो. आत्महत्या करणे चूक आहे, असे सांगितले जाते ते कवीलाही मान्य आहे. पण त्याचा प्रश्न आहे की,

असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी

शेतकर्‍याच्या दु:खाची भाषा सत्तेस कळेल असे ज्ञान कुणी दाखवत नाही कारण सत्तेमुळे नेते चळून गेले आहेत, ते धनवंतांना कुरवाळतात तर श्रमिकाला छळतात. अधिकारीही लाचखोरीला निर्ढावलेले आहेत त्यांमुळे ते

अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी
कुणाच्याच बापास ना घाबरे तो

तर नेतेही मुजोर झालेत कारण

नसतेच जे मिळाले केव्हाच सातजन्मी
ते सर्व प्राप्त होता नेता मुजोर झाला

उलट सत्तेचा वापर जनतेवर अन्याय करण्यासाठीच करतात. शेती करून मालक होणे त्यामुळेच मूर्खता ठरत आहे. तर लाचखोरी करता येणार्‍या नोकरीला सन्मान मिळत आहे.

शेती करून मालक होणेच मूर्खता
सन्मान मोल आहे कर ’अभय’ चाकरी

असे त्यामुळेच स्वतःला बजावतो आहे. या नेत्यांना स्वार्थ मात्र कळतो. एरव्ही बेमुर्वत वागणारे नेते निवडणुकीच्या वेळी मात्र नरम होतात ते अगदी मोजक्या शब्दात व्यक्त करताना कवी म्हणतो

मते पाहताच
नेते नरमले

वास्तविक पैसा जनतेचा असतो पण नेते मात्र ते कसाही उधळतात.. नेते असे वागत असले तरी, सामान्य माणूस मात्र कष्टाने मिळणार्‍या संपत्तीसच खरे धन मानतो.

नको रत्न मोती, न पाचू हिरे ते
अभय ते खरे जे मिळाले श्रमाने

सरकारी योजनांचे पैसे मिळवायचे तर चिरीमिरी द्यावी लागते तरच वाद होत नाही. नेते जनतेत परस्परात भांडणे लावतात. अशांचा जयजयकार करू नये असे आग्रहाने कवी सांगतो.

छाया नरोत्तमाची, अभयास उब देते
त्यांचा उदो कशाला? जे कलह माजवीती

शेतीच्या दुर्दशेचे वास्तव कवी मांडतो ते असे

कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे

या देशाचे दुर्दैव की येथे ना समाजवाद रुजला ना साम्यवाद रुजला, भांडवलशाही मात्र प्रबळ झाली. भ्रष्टाचारी, कंत्राटदार कसे गर्वाने वागतात.

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फुगून गेला
मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे

समाजाच्या वाटेला सत्तेचा अल्पसाही वारा मिळत नाही कारण येथे घराणेशाहीच जोपासली गेली आहे. लबाडांच्या वंशात जन्म मिळणार्‍यांनाच तेथे वाव  आहे.

अम्हांस नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही “अभय” पदांचे
लबाडवंशात जन्म ज्यांचा, तमाम त्यांचा पुढार आहे

तर कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? या गझलेत कवी म्हणतो

“घराणे” उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे

कवीला प्रश्न पडतो

का लोळतात पायी सिंहासने तयांच्या?
अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?

सामान्यांच्या प्रश्नाबाबत पूर्वी पक्षांच्या चळवळी व्हायच्या त्या आता कमी झाल्या आहेत. म्हणून कवीला वाटते की

वादंग वा दुरावा पंक्तीत उरला नाही
डावी उपाशी नव्हती, उजवी जेवली होती

कारण सगळ्यांनीच आता कुठे ना कुठे काही काळ तरी सत्ता उपभोगल्या आहेत.

घामचोरीची तक्रार दाखल केली तेव्हा
विरोधक प्रसन्न नव्हते, सत्ता कोपली होती

अशी दोन्ही बाजूंनी सामान्यांची कुचंबणा  होत आहे.
कवीची जातकुळी नारायण सुर्वे यांच्या व्यथांशी साम्य दाखवते. पूर्वी साहित्यात चंद्र, प्रेयसी यांची म्हणजेच प्रेमाची वर्णने प्रामुख्याने असायची. वास्तव जीवनापासून ती शेकडो मैल दूर असायची. कवी नारायण सुर्वेने एका कवितेत म्हटले आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यातच आयुष्याचा खूप काळ गेला. गझलकार “अभय” म्हणतात

शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळताना

शेतकर्‍यांचे प्रश्न सुटले पाहिजेत असे केवळ शाब्दिक बुडबुडे उडविणारा हा कवी नाही. हा कृतिशील कवी आहे. प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शेतकर्‍यात एकी पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे.

शेतीत राबणाऱ्या खंबीर हो ‘अभय’ तू
एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता

शेतकर्‍यांच्या प्रश्नाची फारशी गांभीर्याने चर्चा होत नाही. आकांताची दखल घेतली जात नाही पण नको त्या प्रश्नांची मात्र चर्चा होते,

आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते

शेतकर्‍याने आंदोलन केले तर त्यांना लाठीमार, गोळीबाराला सामोरे जावे लागते

लाठी उगारताना, बंदूक रोखताना
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?

असा रोकठोक प्रश्न शासनकर्त्यांस विचारतात अन शेतकर्‍याला आपल्या बचावासाठी क्रांतीचा नवा उग्र मार्ग अवलंबावा लागेल असेही ठासून सांगतात. कवी म्हणतात

सत्याग्रहास आता रक्तात माखवावे
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता

या क्रांतीला शब्दांच्या माध्यमाची जोड हवी. रशियातील क्रांतीच्या वातावरण निर्मितीला मॅक्झिमा गॉर्कीच्या “आई” या कादंबरीची मदत झाली होती. म्हणूनच कवी आत्मविश्वासाने म्हणतात

घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी

गझल माझी बंड आणि अन्यायाला दंडही
शेतकर्‍यांच्या मुक्तिसाठी आयुधांची थाळी

कवी केवळ संघर्ष करणारा नाही तर त्याला विधायकतेच्या निर्मितीचा ध्यासही आहे.

चेतनेला पेरून देते अभयतेची खते
संघर्षाला पिकवताना प्रतिभा बनते माळी

मानवी जीवनात प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी युद्धाचा मार्ग अवलंबावा लागतो. पण मानवी जीवन केवळ संघर्षासाठी नाही. त्याला सुख, शांती व समाधानाची नैसर्गिक आस असते. त्यामुळेच कवी मार्मिक शब्दांतून ते व्यक्त करतो.

घमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

शासनकर्त्यांना स्वतःच्या सावलीचीही भिती वाटते. त्यामुळे त्यांना शस्त्राच्या क्रांतीची भीती वाटतेच वाटते. पण शब्दाच्या शस्त्राचीही वाटते. हा कवी नारायण सुर्वे प्रमाणेच संत तुकाराम महाराजांचाही मागोवा घेत चालणारा आहे. त्यामुळेच तो शब्दांना शस्त्राइतके सामर्थ्यवान मानतो. तुकोबाराय म्हणतात,

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू

कवीही शब्दाला शस्त्र बनवतो पण शासनकर्त्याला त्याची भिती वाटते. त्यामुळे

मी म्हणालो फक्त इतुके “शब्द माझे शस्त्र आहे”
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे

कारण आजवरच्या लेखकांनी कधीही ही नोंद केली नाही की,

पुस्तकाने कोणत्याही नोंद नाही घेतली की
कष्ट आणिक भाग्य-लक्ष्मी हाच रेशो व्यस्त आहे

शासनकर्ते समाजावर सवलतीचा वर्षाव करून त्याला कामापासून दूर करत आहे. तर काहींना साहेब बनण्यात भूषण वाटते. कष्ट करणारा शेतकरी मात्र मूर्ख ठरत आहे.

सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल
कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला

निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला

पण हे फार काळ चालणार नाही कारण जनतेला आता कळू लागले आहे, म्हणून कवी निर्धाराने-निश्चयाने म्हणतो,

 श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा

एवढेच नव्हे बळीराजाला पाताळात घालणार्‍या वामनाची सत्ता उलथून टाकण्याची  ईर्ष्या मनात आहे

मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू
त्या बटू वामनाची सत्ता, “अभय” पालटली पाहिजे

     गझल म्हटली की त्याग, प्रेम, शृंगार, यांचाच प्रामुख्याने समावेश असतो. पण गंगाधर मुटे उर्फ “अभय” या गझलकाराच्या गझलांमध्ये शेतकर्‍यांचे जीवन, त्यांचे प्रश्न, त्या प्रश्नांची कारणे, त्याची जबाबदारी कोणाची व ते प्रश्न सोडविण्यासाठी काय करायला हवे, हे सर्व त्यांनी “गझल माझी निराळी” मधून समर्पक व यथार्थपणे मांडली आहे. ही गझल खरोखरच नावाप्रमाणे इतरांपेक्षा निराळी आहे. ती शेतकर्‍यांचे दु:ख सांगणारी आहे. ती केवळ शेतकर्‍याचे दु:ख, व्यथा मांडत नाही तर शेतकर्‍याला साथ, अभय देणारी आहे. ताज्या गारपिठीच्या तडाख्यानंतर शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकर्‍यांना धीर देणार्‍या संघर्षाला व जगण्याला प्रवृत्त करणार्‍या या गझला खरोखरच कौतुकास व धन्यवादास पात्र आहेत.

                                                                                               – विजय  शंकरराव चव्हाण
                                                                                               पद्मावती अपार्टमेंट
                                                                                               पद्मनगर, लातूर
======================================================================

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s