जादूटोणा विरोधी कायदा – एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२)

जादूटोणा विरोधी कायदा – एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२) 
                          कोणताही विषय नेमकेपणाने समजून घ्यायचा असेल तर त्या विषयांची शक्यतो सर्व अंगांनी माहिती करून घेणे आवश्यक असते. ज्यांना या पारंपरिक उपचार पद्धतींबद्दल अजिबात माहिती नसेल त्यांना या उपचार पद्धतीविषयी माहिती व्हावी म्हणून लेखमालेच्या पहिल्या भागात म्हणजे लेखांक-१ मध्ये साप आणि विंचू चावल्यानंतर करण्यात येणारी पारंपरिक उपचार पद्धती कशी असते, ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला. तीन लेखांकामध्ये हा विषय पूर्ण करायचा विचार होता. परंतू पुस्तक किंवा ही लेखमाला मी वृत्तपत्रासाठी लिहीत नसून आंतरजालावर लेखन करत आहे याचे भान आल्याने व काही आततायी प्रतिसादकांकडून माझ्यावर व्यक्तिगत पातळीवर हिणकस आरोप करणारे प्रतिसाद लिहिले जाण्याची शक्यता बळावल्याने, मग प्रत्येकाला स्वतंत्रपणे उत्तर देऊन स्वतःची दमछाक करून घेण्यापेक्षा या लेखांकात आत्मस्तुतीचा दोष स्वीकारून नाईलाजाने स्वतःबद्दल व्यक्तिगत माहिती मी लिहायचे ठरवले आहे. माझ्याविषयी संक्षिप्त माहिती अशी-
१) माझा माझा पूर्ण पत्ता विपूमध्ये लिहिलेला आहे. माझ्या गावातील २५ पेक्षा जास्त मंडळी फेसबुकवर आहे. हा लेख मी फेसबुकवर सुद्धा टाकत असल्याने मी देत असलेल्या माहितीबद्दल वाचकांनी विश्वास बाळगावा. याला संतोषीमातेचे पत्र समजू नये.
२) मी व्यक्तिस्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सरकारची कमीतकमी ढवळाढवळ असावी, असे मानतो. 
३) मी विज्ञानाचा पदवीधर असून विज्ञानाचा आणि नव्या तंत्रज्ञानाचा कट्टर समर्थक आहे.
४) मी स्वतःमूर्तिपूजां करण्याचे टाळतो पण इतरांना मनाई करत नाही. 
५) भविष्य शास्त्रावर माझा विश्वास नाही पण विश्वास असणार्‍यांचा अनादर करत नाही. 
६) मी सनातनी, प्रतिगामी किंवा पुरोगामी या शब्दांपासून स्वतःला वाचवतो. कालबाह्य न झालेले व उपयोगमुल्य शाबूत असलेले जुने ते “सोने” समजतो आणि मला नवे ते “हवेहवेसे” वाटते.
७) जेथे विज्ञानाचे हात टेकतात आणि बुद्धीसुद्धा हतबल होते तिथून श्रद्धेची कक्षा सुरू होते. श्रद्धा ही श्रद्धा असते, डोळस किंवा आंधळी अजिबात नसते. श्रद्धेच्या व्याख्या व्यक्तिसापेक्ष वेगवेगळ्या असू शकतात, यावर माझा विश्वास आहे.
८) कालबाह्य परंपरा व रुढी नष्ट झाल्या पाहिजेत पण त्याऐवजी ज्या नव्या प्रथांचा अंगीकार करायचा आहे त्याचीही कारणमीमांसा झाली पाहिजे, डोळे झाक करून ते स्वीकारायचे नाही मग ते कितीही अद्ययावत का असेना, असे मी मानतो.
९) देवापुढे प्राण्यांचा बळी द्यायचा नाही, याचा मी समर्थक आहे. आमचे घरात दरवर्षी फ़रिदबाबाची पुजा म्हणून बोकड कापून नैवद्य दाखवायची परंपरा होती, मी घरच्या सर्व वडिलधार्‍यांचे मनपरिवर्तन करून ही प्रथा मोडीत काढली.
१०) मजूरवर्गाला सायंकाळी/रात्री मजुरीचे पैसे देऊ नये, असा आमचेकडे समज आहे. त्याला छेद म्हणून गेली २६ वर्ष मजुरांना सायंकाळी/रात्रीच पैसे देत असतो.
११) एका भविष्यवेत्त्याने मला आठवा गुरू असताना लग्न करू नकोस असे सांगितले होते. मग मी मुद्दामच आठव्या गुरूत असतानाच लग्न केले. 
१२) मद्यप्राशनाला माझा कट्टर विरोध आहे पण सक्तीने दारूबंदी करायलाही विरोध आहे.
१३) १९८७ मध्ये गावात राहायला गेलो तेव्हा सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मारुतीच्या पारावर आणून पारंपरिक उपचार करायची पद्धत होती. या पद्धतीपेक्षा वैद्यकीय पद्धतीने त्यावर उपचार व्हावेत म्हणून त्या काळी समवयस्क मुलांना गोळा करून याविषयी सतत जनजागृती केली. स्वखर्चाने दवाखान्यात नेण्याची व्यवस्था केली, मात्र कुणावर कधीही सक्ती केली नाही. बराच काळ लागला पण यश मिळाले. आता सर्पदंश झाल्यास सर्वच थेट दवाखान्याचा रस्ता धरतात. मागील दोन महिन्यात माझ्या गावात ३ शेतकर्‍यांना सर्पदंश झाला आहे. त्यापैकी एका सर्पदंश झालेल्या शेतकर्‍याला माझ्या छोट्या भावाने स्वतःच्या चारचाकीने व स्वखर्चाने त्या व्यक्तिला दवाखान्यात नेऊन भरती केले. तीनही शेतकरी वाचले आहेत.
१४) दोन वर्षापूर्वी गावातील एका इसमाला कर्करोग झाला होता. पण तो नागपूरला मेडिकलमध्ये जाण्याचे टाळून वैद्याकडून जडीबुटीचे औषध घेत होता. मी खूप प्रयत्न केले पण तो मेडिकलमध्ये जायला राजी होत नव्हता. मी त्याला समजावत होतो मात्र सक्ती करत नव्हतो. मग मी पहिल्यांदा त्याच्या कुटुंबीयांना राजी केले. शेवटी रोगीही राजी झाला. मग अडचण आली पैशाची. माझ्यासमोर नाईलाज होता. खर्च मी करायचे मान्य करून त्याला नागपूरला भरती केले. कर्करोग शेवटच्या टप्प्यात पोचल्याने ऑपरेशन झाले पण ६ महिन्यानंतर तो दगावला. आता त्याचा मुलगा दारूचा आहारी गेला आहे व माझे पैसे परत करू शकत नाही, असे त्याने मला स्पष्टपणे कळवले आहे. माझे पैसे परत मिळतील अशी आशा मावळली आहे. चाळीस हजार रुपये सोडून देण्याइतपत मी श्रीमंत नसलो तरी माझा नाईलाज आहे. मात्र त्या पोराला मी एका वाईट शब्दाने देखील बोललेलो नाही माझे पैसे परत करावे म्हणून सक्ती केली नाही, करणार नाही.
१५) एक वर्षापूर्वी एका पेशंटला आजार झाला. त्याने काही दवाखाने केले पण त्याला आराम मिळेना म्हणून तोही वैद्याकडून जडीबुटीचे औषध घ्यायला लागला होता. मी स्वतः त्याला विशेषज्ञ डॉक्टरकडे नेले आणि त्याला हृदयविकार असल्याचे निष्पन्न झाले. दीड लाख रुपये खर्चाची बाब होती. त्याची ऐपत नव्हती म्हणून त्याला “जीवनदायी आरोग्य योजना” आणि अन्य संस्थांकडून सव्वा लाख रुपयाची मदत मिळवून दिली. पेसमेकर इन्प्लँटेशनचे ऑपरेशन यशस्वी झाले. मात्र यासाठी मी माझ्या गाडीचा एकूण दहा हजार रुपयापर्यंत आलेला डिझेल खर्च पेशंटकडून घेतलेला नाही. यावेळी अनेकदा डॉ. कैलास गायकवाड यांनी मला फोनवरून ऑपरेशन संदर्भात बरीच मदत केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
१६) सहा महिन्यापूर्वी एका महिलेला “जीवनदायी आरोग्य योजना” आणि अन्य संस्थांकडून दीड लाख रुपयाची अशीच मदत मिळवून देऊन तिचे दोन्ही व्हॉल्व्ह्चे (एक रिप्लेसमेंट आणि एक रिपेअर) ऑपरेशन करून घ्यायला लावले. याकामी सुद्धा माझे स्वतःचे दहा हजार रुपये खर्च झाले आणि मी ते पेशंटकडून घेतलेले नाही.
मला असे वाटत आहे की, जे लिहिले तेच भरपूर झाले. यापेक्षा आत्मस्तुतीपर लिहिण्याची गरज नाही. आता पुन्हा मूळ लेखाकडे वळतो आणि उर्वरित लेखाचा भाग लेखांक-३ आणि लेखांक-४ मध्ये पूर्ण करतो.
                                                                                                                        – गंगाधर मुटे
———————————————————————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s