हत्या करायला शीक

हत्या करायला शीक

विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे महात्मा जोतीबा फुले म्हणायचे. शेतकर्‍यांची मुलं शाळा-कॉलेजात शिकायला गेली की शिकून-सवरून शहाणी होतील आणि मग शिकून-सवरून शहाणी झालेली शेतकर्‍यांची मुले आपल्या घरातल्या, गावातल्या म्हणजे पर्यायाने शेतकरी समाजातल्या दारिद्र्याचा समूळ नायनाट करतील, असे महात्मा जोतीबा फ़ुलेंना वाटायचे.

विद्या आली की मती येईल, मती आली की निती येईल, निती आली की गती येईल, गती आली की वित्त येईल आणि वित्त आले की अस्मानी-सुलतानी संकटांशी लढण्याचे सामर्थ्यही आपोआपच येईल आणि शेतकर्‍यांचा दिवस उजाडेल असाच दुर्दम्य आशावाद जोपासत म. फुले जगले.

म. फुले गेल्याला शंभरावर वर्षे लोटली. वाहत्या काळाच्या ओघात बर्‍याच उलथापालथी झाल्यात. शिक्षणाचा प्रसार झाला. सर्वदूर शाळा निघाल्यात. महाविद्यालयीन शिक्षणाची व्यवस्था झाली. भरीस भर म्हणून रात्रीच्या शाळाही निघाल्यात आणि शूद्र शेतकर्‍यांची पोरं शिकून मोठी झालीत. उच्च पदावर गेलीत. राजकारणात सत्तास्थानी विराजमानही झाली. पण एकंदरीत शेतकरी समाजाची दुर्दशा काही खंडीत झाली नाही. शेतकर्‍यांची मूठभर पोरं गलेलठ्ठ पगार मिळवती झाली किंवा शेतकर्‍यांची मूठभर पोरं लाल दिव्याच्या गाडीत फिरायला लागली याचा अर्थ एकंदरीत संपूर्ण शेतीमध्येच समृद्धी आली असा कसा घेता येईल?
मग शिक्षणाने नेमके काय केले? याचा जरा शोध घेऊन बघितला तर मोठे मजेदार निष्कर्ष बाहेर यायला लागतात. झाले असे की, शिक्षणाने विद्या आली. विद्येमुळे मतीही आली, पण मती मुळे निती येण्याऐवजी थेट गती आणि वित्त आले. निती नावाचा मधला एक टप्पाच गहाळ झाला. शिवाय वित्त आले की लढण्याचे सामर्थ्यही आपोआपच येईल, असा जोतीबांनी केलेला कयासही शेतकरीपुत्रांनी-शुद्रपुत्रांनी उताणा-उपडा-तोंडघशी पाडला. शूद्राचा पोरगा जेवढा अधिक शिकला तेवढा तो आपल्या इतर शेतकरी बांधवापासून दूर गेला आणि आत्मकेंद्रीत झाला असेच समीकरण दृग्गोचर झाले. संपूर्ण देशात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले पण हा उच्चशिक्षित शेतकरीपुत्र हादरला नाही, पाझरला नाही, विव्हळला नाही आणि पेटून वगैरे तर अजिबातच उठला नाही. शेतकर्‍याच्या जळणार्‍या चिता पाहतानाही तो ढिम्मच्या ढिम्मच राहिला.

“एकजूटीची मशाल घेउनी पेटवतील हे रान” या साने गुरुजींच्या ओळी साकार करण्याचा शिकल्या-सवरल्या-शहाण्या आणि बर्‍यापैकी वित्तप्राप्ती केलेल्यांनी कधी प्रयत्नच केला नाही किंवा चुकून कधी त्या मार्गालाही शिवले नाहीत. कदाचित यात त्यांचा दोषही नसावा. जळत्या घरात आगीचे चटके सोसल्यानंतर त्या घरातल्या एखाद्याला त्या पेटत्या घरातून जर बाहेर पडायची संधी मिळाली तर तो स्वत:चा जीव मुठीत घेऊन जीवाच्या आकांताने पळत सुटतो. पुन्हा मागे वळून त्या घराकडे पाहण्याच्या फंदात पडत नाही किंबहुना मागे वळून त्या घराकडे पाहण्याची त्याच्यामध्ये इच्छाशक्ती उरलेलीच नसते. कदाचित अशाच तर्‍हेच्या सामूहिक मानसिकतेतून शेतीच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी झगडण्याऐवजी आहे त्या व्यवस्थेत स्वत:ला समरस करून घेण्याच्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून ही शिकली-सवरली शेतकर्‍यांची मुले “अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण” असे स्वनातही म्हणायला धजावली नसावीत.

“किसान मजूर उठलेले, कंबर लढण्या कसलेले” असे दृश्य अनेक पाहायला मिळते पण लढण्यासाठी कंबर कसणार्‍यांमधे अशिक्षित आणि अर्धशिक्षित लोकांचाच जास्त भरणा असतो. उच्चशिक्षितांची संख्या मोजायला एका हाताची बोटे देखिल पुरेशी ठरतात किंवा तितकेही नसतात आणि असलेच तर ते लढण्यासाठी नव्हे तर लढणार्‍यांना हुसकावून लावण्यासाठी असतात, लाठ्या घालण्यासाठी असतात किंवा गोळीबाराचे आदेश देण्यासाठी असतात. आणि नेमका येथेच म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या “शिक्षणातून क्रांती घडेल” या तत्त्वाचा पराभव झाला असावा, असे समजायला बराच वाव आहे.  पुढे वाचण्यासाठी क्लिक करा.

One comment on “हत्या करायला शीक

  1. खरोखर नीती हा विषय सुशिक्षितांच्या मनातून नाहीसा झाला आहे. प्रत्येकजन पदवीधर झाला कि फक्त चांगल्या पगाराच्या नोकरीची अपेक्षा करतो. पण एकालाही वाटत नाही कि आपण आपल्या शेतकरी बांधवांच्या कल्याणाचा एक तरी मार्ग त्यांना दाखवावा. प्रत्येक पदाविधाराने आपल्या ज्ञानाचा शेतीच्या समृद्धीसाठी उपयोग करायला हवा. हे करण्याची वेळ आली आहे. कारण अन्न हि एकच गोष्ट असी आहे जी जीवन जगवू शकते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s