कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?
किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे
कधी भाट होई सख्या चेहर्यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?
“घराणे” उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे
जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?
कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे…!
गंगाधर मुटे
—————————————————————————-
गझल वृत्त – सुमंदारमाला
लगावली – लगागा लगागा लगागा लगागा, लगागा लगागा लगागा लगा
—————————————————————————-
हल्ली वृत्तात लिहिणारे कवीही लुप्त झाले आहेत. हे मंदारमालेतले लिखाण वाचून फार बरे वाटले. मुटेसाहेब, आपण विषयही उत्तम मांडला आहे. धन्यवाद.