आंतरजालीय व्यासपीठ

                सध्या आंतरजालावर मराठीमध्ये मोठ्या प्रमाणावर लेखन केले जाते. त्यात ब्लॉग (अनुदिनी) आणि मराठी संकेतस्थळे येथे विपुल लेखन केले जाते. आंतरजालावर लेखन करण्याचा सहजसोपा, कुणाचाही अंकुश नसलेला पर्याय उपलब्ध झाल्याने आजवर निव्वळ  वाचक असलेली मंडळी आता लेखन करायला लागली आहे. त्यामुळे आता आंतरजालावर लेखक, वाचक, समीक्षक, व टीकाकार या वेगवेगळ्या भूमिका एकच व्यक्ती वठवायला लागली आहे. त्यामुळे आंतरजालावरील लेखनाकडे पाहताना काही चित्रविचित्र मुद्दे उपस्थित होत आहेत. त्यातील काही बाबी अशा.
   १) लेखनावर अंकुश नसल्याने तसेच संपादन करणारा कुणीच नसल्याने ज्याला जसे वाटेल तसे लिहायची मुक्तमुभा मिळाली आहे. त्यामुळे लेखकाजवळ त्या विषयाचा पुरेसा अभ्यास व वैचारिक परिपक्वता नसूनही त्याने जर नको तो विषय हाताळला तर त्याच्या वादग्रस्त लेखनाला थोपविता येणे सहज शक्य नाही.
   २) लेखक/कवीला लेखनाविषयीचा स्वतःचा असा एक दृष्टिकोन असतो. इतर लेखक/कवीचा लेखनाविषयीचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो, पण स्वतः लेखक/कवी असलेला व्यक्ती इतरांच्या लेखनावर प्रतिसाद देताना ही बाब दुर्लक्षित करून स्वतःच्या दृष्टिकोनातून  इतरांच्या कलाकृतीकडे बघतो तेव्हा चांगल्या रचना देखिल त्याला भंकस वाटायला लागतात. त्यामुळे एखाद्या उत्तम कलाकृतीचे योग्य ते समीक्षण, मूल्यमापन होईल याची अजिबात शाश्वती देता येत नाही.
   ३) लेखक/कवी हाच प्रतिसादक असल्याने “जो मला प्रतिसाद देतो, मी सुद्धा त्यालाच प्रतिसाद देईन” अशी भावना जोर धरून एकतर कंपूबाजी तयार होते किंवा “मी तुझी पाठ खाजवतो, तू माझी पाठ खाजव” असा प्रकार सर्रास सुरू होतो. त्यामुळे लेख/कवितेचा दर्जा हा मुद्दा गौण ठरतो. त्यामुळे साधारण रचनेवरही भरपूर प्रतिसाद पडतात आणि एखादी उत्कृष्ट रचना दुर्लक्षित राहते. प्रतिसादाच्या संख्येवरून रचनेचे मूल्यमापन करता येत नाही, त्यामुळे प्रतिसादाची विश्वासहार्यता आपसूक कमी होते.
              अर्थात हे मुद्दे सरसकट सर्वांनाच लागू होते असे मला म्हणायचे नाही, आणि हे मुद्दे सरसकट सर्वांनाच लागू पडतही नाहीत, पण मोठ्या प्रमाणावर हे घडत असते एवढे मात्र खरे.
   ४) कविता कशी असावी किंवा कविता कशी नसावी याबद्दल जर एखाद्या कवीला मार्गदर्शनपर सल्ला द्यायचा असेल तर पहिल्यांदा त्या कवीची विचारशैली समजून घ्यायला हवी. त्याचा दृष्टिकोन समजून घ्यायला हवा पण तसे न होता स्वतःच्या फूटपट्टीने अवलोकन करून नको तो सल्ला दिला जातो, त्यामुळे त्या कवीला काही प्रेरणा मिळण्याऐवजी त्या कवीचे खच्चीकरण व्हायचीच जास्त शक्यता असते.
त्यामुळे आंतरजालावर वावरताना काही मूलभूत बाबींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
   १) आजवरच्या सर्व व्यासपीठापेक्षा आंतरजालीय व्यासपीठ हे पूर्णतः भिन्न आहे. कारण येथे जात, पात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, देश, श्रीमंत, गरीब अशा सर्व सीमा ओलांडून एकाचवेळी एकाच व्यासपीठावर वेगवेगळी मंडळी जमू शकतात. त्यामुळे मतभिन्नता असणे किंवा एकच विचार अनेकांनी वेगवेगळ्या शब्दात व्यक्त करणे यात नवल काहीच नाही. आणि येथे लेखकापेक्षा वाचकाचीच जास्त कसोटी लागू शकते, त्यासाठी जालावर वाचक म्हणून वावरताना हे भान ठेवणे गरजेचे आहे.
   २) समविचारी व्यक्ती एकत्र येऊन ग्रुप तयार होणे यात वावगे काहीच नाही, पण त्यात संकुचितपणा नसल्यास कंपूबाजीचे स्वरूप येणार नाही.
   ३) आपले विचार मांडावेत पण दुस‍र्‍यावर लादण्याचा अट्टहास नसावा.
   ४) न पटणार्‍या विचारांना देखिल “असा सुद्धा एक विचार असू शकतो” असे समजून सन्मान द्यावा.
                 हळूहळू आंतरजालिय लेखनाचा/वाचनाचा जसजसा अनुभव वाढत जाईन तसतशी प्रगल्भता आपोआप वाढीस लागेल आणि भविष्यकाळात आंतरजालीय व्यासपीठ हेच सर्वोच्च व्यासपीठ म्हणून नावारूपास येईल, अशी मला खात्री वाटते.
                                                                                                   गंगाधर मुटे
………………………………………………………………………………………………………

3 comments on “आंतरजालीय व्यासपीठ

 1. कंपुबाजी ही फक्त ब्लॉग वरच नाही, तर सगळ्याच सोशल संकेत्स्थळावर चालते. एखाद्या चांगल्या कवितेचा कचरा करणे किंवा अगदी सुमार कवितेला खूप छान म्हणून प्रतिसाद देणे हे तर नक्कीच होतांना दिसते. ( मिपा, माबो, वगैरे ) तू माझी पाठ खाजव मी तुझी हीच मनोवृत्ती दिसते तिथे पण.
  असो, विषय तो नाही, जरी प्रतिक्रिया नसल्या तरीही एखादी चांगली कलाकृती ही चांगली कलाकृती म्हणूनच ऒळखली जाईल. तिची किंमत काही कमी होणार नाही.. हे अगदी खरे.

 2. होय महेंद्रजी, हे खरे आहे. शेवटी चांगली कलाकृती हीच चिरकाल तग धरेल. निकृष्ठ कलाकृतीचा उगीच उदोउदो केला तरी तिला आयुष्य नसणारच, हे उघड आहे.

 3. निरंकुशः कवयः ।

  या नात्याने कवी लोक निरंकुशच असतात. इतर लेखक, समीक्षक आदी लोकही खरे तर निरंकुशच असतात. तेव्हा त्याची तक्रार ती काय करायची.

  मात्र, कवीवर्य सुरेश भट म्हणतात त्यानुसारः

  आज या वर्तमानाला कळेना आमची भाषा
  विजा घेऊन येणार्‍या युगांशी बोलतो आम्ही

  म्हणून, उद्याच्या वाचकाकरता आपण आजच काही लिहून ठेऊ शकतो, ही केवढी अमोघ शक्ती या महाजलीय लेखनाने आपणाला दिली आहे. त्या शक्तीने सशक्त होत्साते, सर्व समाजास सत्वर प्रगतीपथावर नेण्यास आपण कटिबद्ध होऊ तोच सुदिन!

  एरव्ही सामान्यतः मी आपल्या वरील विचारांशी सहमतच आहे.

  स्टार माझाने आपल्या अनुदिनीची निवड केल्याखातर हार्दिक शुभेच्छा!

  स्नेहाभिलाषी
  नरेंद्र गोळे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s