अंगावरती पाजेचिना….!!
इभ्रतीला झाकेचिना, तिला चोळी का म्हणावे?
भुकेल्याला लाभेचिना, तिला पोळी का म्हणावे?
वास्तवाला चितारेना, तिला शाई का म्हणावे?
अंगावरती पाजेचिना, तिला आई का म्हणावे?
श्रमाविना पैदासते, तिला वृद्धी का म्हणावे?
पीडितांना कुस्कारते, तिला बुद्धी का म्हणावे?
अस्सलाची विटंबना, तिला नक्कल का म्हणावे?
बुरशीवाणी परजीवी, तिला अक्कल का म्हणावे?
विवेकाला स्मरेचिना, तिला सुज्ञ का म्हणावे?
तारतम्य हुंगेचिना, तिला तज्ज्ञ का म्हणावे?
अभयाने बोलेचिना, तिला वाणी का म्हणावे?
अंतरात्मा हालेचिना, तिला ज्ञानी का म्हणावे?
गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….
कविता छान आहे, पण तिला ‘अंगावरती पाज़ेचिना’ हे शीर्षक भडक वाटते. ‘कशाले काय म्हनू नही’ हे शीर्षक कसे सुटसुटीत आणि समर्पक आहे. त्या कवितेची छाप तुमच्या कवितेवर अर्थातच आहे. एकूण कविता उत्तम आहे.
– नानिवडेकर
धन्यवाद नानिवडेकरजी. ‘अंगावरती पाज़ेचिना’ हे शीर्षक भडक वाटते हे खरे आहे पण कवितेचा गाभा हाच आहे, त्यामुळे नाईलाज आहे. ‘कशाले काय म्हनू नही’ हे बहिनाबाईंनी अधिकारवाणीने लिहिले. त्यांचा अधिकारच होता तो. मी मात्र आपल्या कक्षा जाणुन फ़क्त प्रश्न उपस्थित केला आहे. “म्हणावे की म्हणु नये” हे वाचकांवर सोपवले आहे.
कविता छान आहे.
धन्यवाद सत्याजी.