औंदाच्या उन्हाळ्यानं, धमालच केली
आनं श्याम्याची दाढीमिशी, भाजूनच गेली ..॥१॥
हे ऊन व्हंय का कां व्हंय, काही समजत नाही
पाण्यासाठी जीव कसा, करते लाही-लाही
पन्नास डिग्रीच्याह्यवर, पारा चढून गेला
पाणी पेऊ-पेऊ जीव, आदमुसा झाला
इच्चीबैन ओठ-जीभ, सोकूनच गेली ……॥२॥
बाहेर निघतो म्हणलं तं, जम्मून झावा चालते
घरामंधी घुसावं तं, उकाडा फ़ोडणी घालते
लोडशेडिंग पायी बाप्पा, नाकात नव आले
कूलर-पंखे गर्मी पाहून, कामचुकार झाले
उष्माघात आकडेवारी, वाढूनच गेली ……॥३॥
नदी-नाले कोरडे कारण, बरसात नाही झोंबली
पाणी कमी हाय म्हून, वीजनिर्मिती थांबली
नळामधून पाणी कमी, हवा शिट्ट्या मारते
विहीर-तलाव ठणठण, पाणी आंग चोरते
दुष्काळाची बहीणमाय, माजूनच गेली ……॥४॥
पशू-पक्षी अभय नाही, निवारा ना थारा
मागून-पुढून मस्त देते, चटके गरम वारा
दैवाचे फ़टके सोसून, माऊल्या झाल्या धीट
घागरभर पाण्यासाठी, अर्धा कोस पायपीट
नशिबाले जगरूढी, चिपकूनच गेली ……॥५॥
गंगाधर मुटे
…………………………………………………
ढोबळ मानाने शब्दार्थ.
जम्मून = जोराने,झपाट्याने.
झावा = गरम हवेचे तडाखे.
…………………………………………………
“बाहेर निघतो म्हणलं तं, जम्मून झावा चालते
घरामंधी घुसावं तं, उकाडा फ़ोडणी घालते
लोडशेडींग पायी बाप्पा, नाकात नव आले
कुलर-पंखे गर्मी पाहून, कामचुकार झाले”
Waah wah . Ek number. As always . you are the best !
धन्यवाद शंतनुजी..!