मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश

-चेतना प्रधान, विभागीय सहाय्यक संचालक, भाषा संचालनालय

इ. स. १९६०मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर इ. स. १९६४मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठीला राजभाषेचा कायदेशीर दर्जा प्राप्त करून दिला. इंग्रजी राजवटीत मराठी भाषेला राजाश्रय नव्हता. ज्ञानार्जनाचे प्रमुख साधन म्हणजे भाषा. केवळ विकासासाठी नव्हे तर अस्तित्वासाठी सुद्धा भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा यावा लागतो. यासाठी शास्त्रीय व तांत्रिक शिक्षणाचे माध्यम मराठी असणे आवश्यक होते. ज्ञानभाषा म्हणजे ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान देण्याची भाषा. यामध्ये पहिली अडचण अशी होती की, शास्त्रीय व तांत्रिक विद्या शाखांसाठी आवश्यक असलेला पारिभाषिक शब्दसंग्रह उपलब्ध नव्हता. सर्व विद्यापीठांतून समान व एकरूप परिभाषा वापरली जावी यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक होते.

या अनुरोधाने महाराष्ट्र शासनाचे भाषा संचालनालयांतर्गत कार्यरत असणार्‍या भाषा सल्लागार मंडळाचे सदस्य व महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांची एक संयुक्त बैठक होऊन त्यात पदव्युत्तर स्तरापर्यंत शास्त्रीय व तांत्रिक विषय धरून सर्व विषयांची परिभाषा शासनाने तयार करावी असे ठरले. या निर्णयानुसार शास्त्रीय मराठी परिभाषा विकसित करण्याच्या प्रयोजनार्थ भाषा संचालनालयाने शास्त्रीय व तांत्रिक विद्याशाखांतील निरनिराळ्या विषयांच्या उपसमित्या स्थापन करून त्यांच्या साहाय्याने अजूनपर्यंत सुमारे ३१ परिभाषा कोश प्रकाशित केले आहेत. यामध्ये लोकप्रशासन, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, वाणिज्यशास्त्र वाणिज्यशास्त्र, वृत्तपत्रविद्या व वाङ्मयविद्या अशा अनेकविध विषयांचा समावेश आहे.

या परिभाषा कोशांच्या निर्मितीसाठी एका उपसमितीची स्थापना करण्यात येते. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे व मराठी विज्ञान परिषदेचे प्रतिनिधी यांची मिळून ही उपसमिती बनलेली असते. विद्यापीठांचे प्रतिनिधी हे संबंधित विषय विद्यापीठांत किंवा महाविद्यालयांमध्ये शिकवत असतात. विद्यार्थ्यांबरोबर त्यांचा सतत संपर्क असतो. त्यामुळे एखादा विषय शिकविताना प्रत्यक्षात काय अडचणी असतात याची त्यांना कल्पना असते. त्यांचे ज्ञानही अद्ययावत असते. परिभाषा निर्मितीचे काम बरेचसे जिकिरीचे व बौद्धिक स्वरूपाचे असते. परिभाषा निर्मितीच्या कामात महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे सक्रिय सहभागी होत असल्यामुळे एका अर्थाने महाराष्ट्रातील सर्व प्रदेशाचे प्रतिनिधित्व होते.

परिभाषा निर्मितीच्या कामात निव्वळ विषयाचे ज्ञान असून चालत नाही. दर या ज्ञानाच्या जोडीला भाषिक समस्यांकडे पाहण्याची वैज्ञानिक दृष्टी आवश्यक असते व म्हणून व्याकरणशुद्ध परिभाषा घडविण्यासाठी एका भाषा संस्कृत तज्ज्ञांची देखील या उपसमितीवर नेमणूक करण्यात येते. ज्याप्रमाणे आंधळ्यांच्या पाठीवर लंगडा बसला की लंगडा वाट दाखवितो व आंधळा त्याला पाठुंगळीस घेऊन वाटचाल करतो त्याप्रमाणे विषयतज्ज्ञ व भाषातज्ज्ञ हे दोघे एकमेकांच्या सहकार्याने परिभाषा निर्मितीचे काम करतात.

परिभाषा कोशासंबधी बोलताना आपल्याला प्रथम परिभाषा म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. परिभाषा म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये वापरावयाची भाषा. ही भाषा सामान्यतः: व्यवहार भाषेपेक्षा वेगळी असते. परिभाषेमध्ये अर्थातील नेमकेपणा अपेक्षित असतो. हा नेमकेपणा ज्या शब्दांनी साधला जातो त्या शब्दांना ‘पारिभाषिक संज्ञा’ म्हणतात. विज्ञानात अशा शब्दांची ते वापरण्यापूर्वी व्याख्या दिलेली असते. त्यामुळे पारिभाषिक संज्ञेला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो.

व्यवहारात संवाद साधताना आपण फारसे काटेकोर शब्द वापरत नाही. कधी-कधी एकाच शब्दाचे दोन-तीन अर्थ होऊ शकतात. अनेकार्थी असणे हा पारिभाषिक शब्दांमध्ये दोष असतो. पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत शक्यतो एक शब्द – एक अर्थ असेच व्हावयास हवे. तसेच पारिभाषिक शब्दांमध्ये स्पष्टार्थता हा गुण हवा. त्यात एकरूपता हवी. पारिभाषिक शब्द अल्पाक्षरयुक्त असावेत, म्हणजेच अशा शब्दांच्या निर्मितीमध्ये कमीत कमी अक्षरांचा वापर असावा. (उदा० crystallisation ‘स्फटिकीकरण’ ऐवजी ‘स्फटन’, magnetization ‘चुंबकीकरण’ ऐवजी ‘चुंबकन’ polarization ‘ध्रुवीकरण’ ऐवजी ‘ध्रुवण’) असे काही निकष व भाषा सल्लागार मंडळाने तयार केलेली निदेशक निदेशक तत्त्वे यांच्या साहाय्याने उपसमितीचे कामकाज चालते.

उपसमिती स्थापन झाल्यानंतर तिच्या पहिल्या बैठकीमध्ये उपस्थित प्रतिनिधींमधून सर्वसंमतीने अध्यक्षांची निवड करण्यात येते. भाषा संचालक अगर त्यांनी नियुक्त केलेला अधिकारी सदर उपसमितीचा सदस्य-सचिव म्हणून काम पाहतो. अध्यक्ष प्रत्येक सदस्याला त्या-त्या विषयातील पोटविषय वाटून देतात. पारिभाषिक संज्ञांमध्ये catalyst, enzyme, valency, nucleus, parabola ह्यांसारखे शुद्ध पारिभाषिक शब्द affinity, critical, function, set, neighbourhood ह्यांसारखे अर्धपारिभाषिक शब्द आणि या शब्दांचा परिभाषेत वापर होत असताना प्रयुक्त होणारे form, glass, map, machine, transfer ह्यांसारखे सामान्य शब्दसुद्धा अंतर्भूत होतात. सदस्यांनी पुरविलेल्या पारिभाषिक संज्ञांवर बैठकीमध्ये साधक-बाधक चर्चा होऊन पर्याय निश्चितीचे काम केले जाते. प्रत्येक इंग्रजी शब्दातील गर्भितार्थ, त्याची छटा, त्याचे अनेकविध संभाव्य वापर ह्यांसारख्या अनेक बाबी लक्षात घेऊन परिभाषा निर्मितीचे काम प्रयत्नपूर्वक करावे लागते. संबंधित विषयातील तज्ज्ञ, सदस्य पारिभाषिक शब्द नव्याने घडवितात. नव्याने शब्द निर्माण करण्याच्या (coining) ह्या प्रक्रियेमध्ये नव्याने तयार करण्यात आलेला प्रतिशब्द भाषिक कसोटीवर तपासून पाहण्याचे काम संस्कृततज्ज्ञ किंवा भाषातज्ज्ञ करतात.

परिभाषा निश्चित करताना कधी-कधी दुसर्‍या भाषेतून म्हणजेच इंग्रजीतूनही तांत्रिक शब्द उसने घेण्यात येतात. उदा० लिटर, मीटर, केबल, प्रोटॉन, न्यूट्रॉन इ० कधी दुसर्‍या भाषेतील शब्द त्यातील कल्पनेसह आपल्या भाषेशी जुळते करून घेण्यात येतात. म्हणजेच इंग्रजी शब्दांना मराठीची प्रत्यय प्रक्रिया लावून नवीन मराठी रूपे बनविली जातात. उदा० mercurization मर्क्यूरन pastrurization पाश्चरण, decarbonization विकार्बनन, voltage व्होल्टता, electroni इलेक्ट्रॉनी, इ० आंतरराष्टीय स्वरूपाच्या सर्व संज्ञा, मूलद्रव्ये, संयुगे वगैरेंची नावे त्यांच्या इंग्रजी स्वरूपातच जशीच्या तशी लिप्यंतरित केली जातात.

अशा रीतीने सर्व तज्ज्ञांच्या सहमतीने तयार झालेले हे पारिभाषिक शब्द बोजड आहेत, कृत्रिम आहेत, सामान्यांना समजत नाहीत अशी या कोशांवर टीका होते. तथापि, मराठी परिभाषा तयार करताना सर्व भाषांची जननी असणार्‍या संस्कृतची मदत घेणे अपरिहार्य ठरते. संस्कृतोद्भव शब्दांच्या व प्राकृत मराठी व्याकरणाच्या साहाय्याने परिभाषा निश्चित करावी लागते. म्हणून ती क्लिष्ट व दुर्बोध होत नाही. मराठी परिभाषेवर होणारा संस्कृतप्रचुर, क्लिष्ट व बोजडतेचा आरोप तितकासा खरा नाही. बहुदा नवीन प्रतिशब्द प्रथम अपरिचित वाटल्याने अपरिचयात् अवज्ञा होते.

इंग्रजीमध्ये देखील ग्रीक-लॅटिन भाषेतून अनेक शब्द आले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे haematology. Hem ह्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ रक्त यावरून हा शब्द तयार झाला आहे. इंग्रजीमध्ये blood science असे कोणी म्हणत नाही. Haemवरून haematoma, haematoxylin, haematuria, haemocytoblast असे अनेक शब्द तयार झाले आहेत. मराठी परिभाषा कोशांमधील अभियंता, अभियांत्रिकी ह्यांसारखे कित्येक शब्द आता लोकव्यवहारात आत्मसात झाले आहेत, रूढ झाले आहेत. नव्याने निर्माण केलेली परिभाषा लेखनात वारंवार वापरल्याने कालांतराने विकसित होते, रूढ होते. कायद्याची भाषा, शासन-व्यवहाराची भाषा, विज्ञान व तंत्रज्ञानाची भाषा म्हणून मराठी समृद्ध करायची असेल तर विशिष्ट परिभाषा स्वीकारायलाच हवी. शास्त्रीय परिभाषा ही सतत विकसित व्हायला हवी व त्यासाठी ग्रंथ निर्मिती होणे आवश्यक आहे. नवीन निर्मिती जुन्यापेक्षा सरस असणे हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. सुधारित कोश तयार करण्याच्यावेळी मधल्या काळात झालेल्या ग्रंथनिर्मितीची दखल घेणे आवश्यक ठरते. सुधारित कोश तयार करण्याचे काम हे नव्याने कोश करण्याइतकेच व्यापक स्वरूपाचे असते. निरनिराळ्या विद्यापीठांकडून उपसमितीवर त्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी सदस्य नेमले जात असल्याने त्या विषयातील विविध पोटविषयांत विशेष ज्ञान मिळवलेले तज्ज्ञ आपसूक उपलब्ध होतात. विद्यापीठांचे प्रतिनिधी आपले अनुभव लक्षात घेऊन परिभाषेत सुधारणा आणि आवश्यक ती भर घालत असतात. अशा रीतीने पूर्वी तयार करण्यात आलेल्या परिभाषेचे पुनरीक्षण गुणवत्तेच्या निकषांवरही आपोआप होत असते. सर्वच भाषांमध्ये शब्दांच्या संख्येमध्ये नवीन भर पडतच असते. त्यांची योग्य ती दखल वेळच्यावेळी घेतली जावी म्हणून कोशांच्या सुधारित आवृत्ती काढणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे ज्ञानक्षेत्राचा जसजसा विकास होत जातो, तसतशी त्या क्षेत्राशी संबद्ध असलेली भाषा प्रगत होते. ज्ञानाच्या प्रगतीबरोबर भाषेने पावले टाकली नाहीत तर ज्ञानाच्या प्रगतीबरोबर भाषेने पावले टाकली नाहीत तर ज्ञानाच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता असते.

परिभाषा कोशांखेरीज भाषा संचालनालयाने न्यायालयीन उपयोगाकरिता न्याय व्यवहार कोशदेखील प्रकाशित केला आहे. राज्य विधानमंडळात सादर केली जाणारी विधेयके आणि राज्य अधिनियम ह्यांचा मराठी अनुवाद करण्याचे काम सुरुवातीपासूनच ह्या संचालनालयात केले जाते. काही वर्षांनी अधिनियमांच्या मराठी अनुवादाचे कामही नव्याने सुरू करण्यात आले. हे अनुवाद करताना इंग्रजी संज्ञांकरिता वापरण्यात आलेल्या मराठी पर्यायांमधून विधि क्षेत्रातील परिभाषा आपोआप निर्माण होत गेली. त्या परिभाषेवर कोश या दृष्टीने सर्व संस्कार करण्यात येऊन न्याय व्यवहार कोश प्रसिद्ध करण्यात आला.

वस्तुतः:, आधी भाषा व मग कोश ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भाषेत वापरले जाणारे शब्दच कोशात दाखल होतात. तथापि, पारतंत्र्यामुळे भारतासारख्या काही देशांवर परभाषा लादली गेली. व मध्यंतरीच्या काळात देशी भाषा ज्ञानभाषा म्हणून विकसित होण्याची प्रक्रिया थंडावली. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात इंग्रजी हीच आपली आधुनिक जगातील ज्ञानभाषा झाली असल्याने आपणास आता भाषांतर–प्रक्रियेचा अवलंब करावा लागत आहे. ग्रामीण भागातील जनतेला ज्ञानाविज्ञानाची ओळख करून देण्यासाठी आपल्याला प्रादेशिक भाषांमधून ग्रंथनिर्मिती करावी लागणार आहे व त्यासाठी नवी शास्त्रीय परिभाषा घडवणे गरजेचे आहे. म्हणून या बाबतीत आधी परिभाषा कोश व मग देशी भाषेतील ग्रंथलेखन ही कृत्रिम प्रक्रिया अवलंबावी लागत आहे.
(श्री चित्तरंजन यांच्या सहकार्याने मनोगत वरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s