मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी
८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.द.भि.कुळकर्णी यांनी त्यांच्या भाषणामध्ये भाषा शुद्धी आणि समृद्धतेच्या अनुषंगाने काही मौलीक विचार व्यक्त केले आहेत. त्यावर अधिक चर्चा होऊन भाषालेखनासंबधात काही निटनेटके,सुस्पष्ट आराखडे तयार होणे गरजेचे आहे.
मी साहित्यीक नाही,पण अधून-मधून गद्य-पद्य लिखान करण्याची उर्मी काही पिच्छा सोडत नाही त्यामुळे फ़ुटकळ स्वरूपात का होईना लिखान चालूच असते त्यामुळे मी साहित्यीक नसलो तरी साहित्यापासून अलिप्तही नाही.
भाषेची शुद्धता आणि समृद्धी या दोन्ही अंगाचा विचार करतांना दोन्ही बाबी लवचिक असल्या तरच दोन्हीचा समन्वय साधून भाषाविकास साधला जाऊ शकेल.
शुद्धतेचा ध्यास हवा पण भाषेच्या समृद्धीसाठी नवनविन शब्दांचा स्विकार करण्यासाठी दरवाजे सताड उघडे असले पाहीजेत. परभाषेतील काही शब्द मायभाषेत वापरतांना निसंकोच वापरले गेले पाहीजेत कारण त्या शब्दांना मराठीत पर्यायी शब्द असेलच याची शाश्वतीच नसते. जसे की एन्डोसल्फ़ान, सायपरमेथ्रीन, पॅरासिटामॉल वगैरे. तर काही शब्दांना मराठीत पर्यायी शब्द तयार केले जाऊ शकते जसे की सॉफ़्टवेअर,हार्डडिस्क, ब्लॉग वगैरे. पण ह्या संशोधनाचा उगम ज्या भाषेत झाला असेल, सहाजीकपणे त्याच भाषेतील शब्द प्रथम सर्वश्रुत होतात.ब्लॉग या शब्दाने जेवढा लवकर बोध होईल तेवढा बोध अनुदिनी या शब्दाने होणार नाही हे उघड आहे. तरी पण हे मराठीशब्द शक्य तेवढे वापरायलाच हवे. मात्र तसा अट्टाहास धरणे फ़ारसे लाभदायक ठरणार नाहीत.
याउलट मराठी भाषेच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या मराठी बोली बोलल्या जातात. त्या स्थानिक बोलीभाषा असल्यातरी समृद्ध आहेत.प्रत्येक बोलीभाषेचे स्वत:चे शब्दभांडार आहेत. स्वत:ची ढब,ठेवन आहे. या बोलीभाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत की त्याला पर्यायी शब्द प्रमाणभाषेमध्ये आज उपलब्ध नाहीत.उदाहरणार्थ,
विदर्भात मुख्यत्वे वर्हाडी आणि झाडी भाषा बोलली जाते हे सर्वश्रुत असले तरी नागपुर,वर्धा आणि आसपासच्या क्षेत्रात जी भाषा बोलली जाते ती ना झाडीबोली आहे ना वर्हाडबोली आहे,तर ती स्वतंत्र बोलीभाषा आहे. ज्याला मी नागपुरी बोली म्हणतो. ही नागपुरीबोली सुद्धा परिपुर्ण,समृद्ध बोली आहे. या बोलीत बोलतांना एखादा शब्द नसल्याने मी कुठे अडखळलो अथवा जे म्हणायचे होते तसे सक्षमपणे बोलताच आले नाही, असे कधी घडल्याचे मला स्मरत नाही. पण या बोलीमधील चांगले- चांगले शब्द सुद्धा प्रमाणभाषेत आलेले नाहीत.
उदा :- टोंगळा,घोटा,वज,हिडगा,गंज,गुंडी,कोपर,भेद्रं,चारं,टेंबरं,धान,आंबिल,सुतना,मनिला,खकाणा,भोकणा,
लमचा,इच्चक,चेंगड,सांडशी,बुहारा,पिलांटू,बंबाड,लल्लाऱ्या,माहुरा,बोथर,टालगी,जित्रुब,पहार,बाज,
जुप्न,सुदा,नावकुल,नावनाव,बंदा,सप्पा,सिद्दा,अध्धर,दाल्ला,ऐनक,बेकुब,मेकुड,आव,कवटा,खाती,
कंदोरी,शायवान,तुत्या,इरित,वार्त,वार्ती हे सर्व अर्थबोधक शब्द असूनही यापैकी बहूतांश शब्दांना प्रमाणभाषेत अजिबात पर्यायी शब्द नाहीत.
टोमॅटोला भेद्र हा पर्यायी शब्द प्रमाणभाषा का स्विकारीत नाही हे गौडबंगालच आहे.
असे नविन शब्द प्रमाणभाषेत रूजविने फ़ारसे कठीन काम नाही. लिखान करतांना ते वापरले पाहीजेत आणि सर्वांना कळावे यासाठी तळटीप देऊन अर्थ दिले पाहीजेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मराठीभाषा शुद्धी आणि समृद्धतेची अपेक्षा व्यक्त केली तर त्यासाठी सर्वांनी काही ना काही प्रयत्न करून अमलात आणले पाहीजेत आणि त्या पदाची बुज राखली पाहीजे. तोच त्या पदाचा यथोचित सन्मान ठरेल असे मला वाटते.
गंगाधर मुटे
तुमचा ब्लॉग चांगला आहे. मी नेहमी वाचतो. तुम्ही नेमका विषय उचललात. मलाही यावर लिहायचं होतं. कधीतरी लिहिन.
-या बोलीमधील चांगले- चांगले शब्द सुद्धा प्रमाणभाषेत आलेले नाहीत.
त्याला कारण त्या त्या बोलीतले वाङ्मय प्रमाण भाषेत आले नाही. ब्लॉग्जमुळे आता ती प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या काही वर्षात या प्रक्रियेला गती येईल, असे वाटते.
शक्यतोवर बोली आणि संस्कृत किंवा देशी भाषा यांच्या संकरातून नवीन शब्द यावेत. म्हणजे ते रूळण्यास अडचण येत नाही. उदा. चतकोर हा शब्द.
गंगाधरजी, आपल्याशी १००% सहमत.
देविदासजी, प्रतिसादाबद्दल आभारी आहे,
या विषयावर लिहाल तेव्हा माहीती द्याल, ही विनंती.
हेरंबजी, प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
बोलीभाषा हीच प्रमाण भाषा जेव्हा होईल तेव्हा हा प्रश्न उरणार नाही. अहो सामान्य मानसंच चांगले शब्द तयार करतात.मी एकदा शासकीय कामानिमित्त कोंकणात गेलो होतो .तेथे एका वृद्ध माउलीनं अर्थिंग चा उल्लेख भुईता असा केला आणि तो शब्द मी सगळीकडे माझ्या लिखाणात वापरायला सुरुवात केली तर मंत्रालयातील एका शहाण्या अधिकार्याने मला विचारले ह शब्द कॊषाट नाही तुम्ही कूठून आणलात ? आता बोला .मी काय उत्तर देणार?
http://savadhan.wordpress.com
अगदी बरोबर आहे.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
http://marathishabda.com/content/मराठीभाषा-शुद्धी-आणि-समृद्धी-गंगाधर-मुटे
आपल्या लेखाची माहिती वरील दुव्यावर दिली आहे. तुम्ही जे मत मांडले आहे त्याचा मराठी शब्द नेहमीच पुरस्कार करत आला आहे त्यामुळे तुमच्या विचारांशी १००% सहमत!
धन्यवाद भागवत साहेब.
आभारी आहे.
तुम्ही मांडलेली भूमिका व अपेक्षा योग्यच आहे. बोली भाषेतले सर्वच शब्द प्रमाणभाषेत येत नाहीत, परंतु ते नित्याच्या वापरात सर्वत्र येऊ लागले की आपोआपच त्यांचे प्रमाणभाषेत स्वागत होईल. काही काळ जावा लागेल. भाषेची समृद्धी साधण्यासाठी ते आवश्यकच आहे.
तुमचे लेखन मला आवडले. तुम्ही भाषा आणि जीवन हे मराठी अभ्यास परिषदेतर्फे प्रकाशित केले जाणारे त्रैमासिक वाचता काय? त्यात प्रस्तुत विषयावर आजवर अनेक वेळा लेखन, सूचना, प्रतिसाद आलेले आहेत. तुमच्या वाचनात किंवा पाहण्यात हे नियतकालिक आलेले नसल्यास कळवावे.
विजय
भाषा आणि जीवन हे मराठी अभ्यास परिषदेतर्फे प्रकाशित केले जाणारे त्रैमासिक वाचनात आले नाही. कृपया अधिक माहिती द्यावी.