भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-१

आश्विनच्या भुलाया : महिलांच्या व्यथा. भाग-१

बालपणीच्या अशा फ़ारच कमी आठवणी असतात ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाला कितीही रंग बदलू देत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात. एका अर्थाने ह्या आठवणी माणसाला “डोळस दृष्टी” प्राप्त करून देत असतात. आज महिला दिनाच्या निमित्ताने झालेली अशीच एक आठवण.

माझ्या बालपणीच्या (1970-75) काळात मनोरंजनाची साधने एकतर विकसित झाली नव्हती किंवा ग्रामिण भागापर्यंत पोचलेली नव्हती. दिसलाच तर एकट-दुकट रेडियो दिसायचा.दळवळणाची साधने म्हणजे सायकल (फ़क्त पुरूषांसाठी. स्त्रीला सायकलवर बसवणे लाजिरवाणे वाटायचे आणि चेष्टेचा विषय ठरायचे) किंवा रेंगीबैल. (छकडा,दमनी वगैरे) ईलेक्ट्रीक,टेलिफ़ोन गावात पोचायची होती. अर्थात ग्रामिण स्त्री-जनजीवनाचा बाह्य जगाशी फ़ारसा संबंध येत नव्हता. त्यामुळेच महिलाप्रधान सण जिव्हाळ्याने साजरे केले जात असावेत.

आश्विन शु.१० ते कोजागिरी पोर्णिमेपर्यंतचा काळ “आश्विनच्या भुलाया” म्हणुन साजरा केला जातो.या काळात मातीच्या बाहुल्या/भुलाया मांडून दररोज नित्यनेमाने गाणी म्हटली जातात. त्याकाळी छोट्या-छोट्या बालिकापासून जख्खड म्हातार्‍या महिला सुद्धा यामध्ये गाणी गायनासाठी सहभागी होत असे. त्या पैकी काही गाणी ऐकतांना माझ्या अंगावर काटा उभारायचा.तर काही गाणी ऐकून मन खुप-खुप उदास व्हायचे. कारण त्या गीतात महिलांची अपार दु:खे साठवलेली असायची. साताजन्माच्या असहायतेची कारुण्यता प्रकट झालेली असायची. अबला म्हणुन आयुष्य कंठतांना वेळोवेळी झालेली कुचंबना/मिळालेली हीन वागणुक स्पष्टपणे प्रतिबिंबीत झालेली असायची. आणि त्यासोबतच अठराविश्व दारिद्र्य लाभलेल्या संसाराचा गाडा हाकलतांना झालेली दमछाक व ससेहोलपट ठळकपणे अधोरेखित झालेली असायची.

त्यापैकी एका गीताची थोडक्यात चर्चा करूया.(ते गीत आताशा निट आठवत पण नाहीये)
या गीतामध्ये एका सुनेची माहेरची ओढ आणि कुटूंबातील उर्वरित सदस्यांची हतबलता दिसून येते.
नुकतेच लग्न होवुन सासरला नांदायला आलेल्या सुनेला तिच्या माहेरची आठवण होते,आईच्या आठवणीने जीव व्याकुळ झालेला असतो.तिकडे आईला सुद्धा लेकीची आठवण होऊन गहिवरलेले असते. म्हणुन मायलेकिंची गाठभेठ करून देण्यासाठी बाप लेकीला घेण्यासाठी आलेला असतो. बाप घ्यायला आलेला बघून आनंदाने उल्हासित झालेली सून सासूला हळूच भीत-भीत विचारते.

सून :- हात जोडूनी पायापडूनी
सासूबाई मी विनविते तुम्हाला
बावाजी आले घ्यायाला
जावू का मी माहेराला,माहेराला?

माहेरला जायची रितसर परवानगी सूनबाई मागते आहे हे बघून सासू थोडी भांबावते.तीच्या समोर अनेक प्रश्न उभे राहातात.एक तर काहीना काही पैसा लागेलच जो घरात नाहीच. दुसरे असे की शेतीत काम करणारे दोन हात पण कमी होणार. म्हणुन ती सूनेला म्हणते.

सासू :- कारलीचे बी लाव गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.
कारलीच्या बियानाची लागवड करून माहेराला जाण्याचा सल्ला सूनेला मनोमन पटतो.ती बेगीबेगी लागवड उरकते आणि पुन्हा विचारते.
सून :- कारलीचे बी लावलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.
एक वेळ मारून नेता आली.आता पुढे काय? पुन्हा सासूबाई शक्कल लढवते.
सासू :- कारलीचा वेल निघू देगं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.

सून पुन्हा काही दिवस कळ काढते आणि विचारते.
सून :- कारलीचा वेल निघालाजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.

सासूसमोर पुन्हा तोच यक्षप्रश्न. नाही म्हणता येत नाही आणि पाठवायला गेले तर संसाराचं अर्थशास्त्र कोसळणार. कौटिल्याची अर्थनिती कळायला अर्थतज्ञ किंवा अर्थमंत्रीच लागतो या समजाला तडा देणारी सासूची वर्तणूक. आणि मग नवनविन युक्त्या लढविणे सासूचा नित्यक्रमच बनून जातो.

सासू :- कारलीला फ़ूल लागू देगं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.
सून :- कारलीला फ़ूल लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.

कारलीचा वेल मांडवावर गेलाय.वेल फ़ुलांनी बहरून गेली. पण नशिब….?
सासू :- कारलीला कारले लागू देगं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.
सून :- कारलीला कारले लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.

आता कष्ट फ़ळांस आले. लदबदून कारली पण लागलीत. मग अडचन कसली?
होय.थोडी अडचनच. कारली बाजारात नेऊन विकल्याखेरीज पैसा कोठून येणार?

सासू :- कारलीला बाजारा जाऊ देगं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.
सून :- कारली बाजारात गेलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.

कारली बाजारात गेली आहे. खरे तर हे गीत यापुढे आनंदाच्या क्षणांकडे वळायला हवे. एवढ्या मेहेनतीने पिकविलेली कारली बाजारात जाणे हा आनंदाचा क्षण.कारण आता घरात पैसे येणार. माल विकायला बाजारा गेलेला घरधनी घराकडे काहीना काही खरेदी करून सोबत भातकं (खाऊ) आणि चार पैसे घेऊन परतायला हवा.पण पुढे या गीतात तसे काहीच होत नाही. याउलट घरात चिडचीडपणा, उदासिनता वाढीस लागलेली दिसते. आजपर्यंत घरात एकमेकाशी गोडीगुलाबीने वागणारी माणसे आता नैराश्याच्या भावनेतून एकमेकांशी फ़टकून वागतांना दिसत आहे.
काय, नेमके झालेय तरी काय? कारली मातीमोल भावाने तर नाही खपली ना? की कारलीच्या खरेदीला कोणी घेवालच मिळाला नाही?
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात ते बसत नसेल तरीही तेच खरे असावे.

आता हा शेवट पहा.
आतातरी आपल्याला माहेराला जायला मिळणार की नाही या विचाराने ग्रस्त झालेली सून परत एकदा सासूला विचारती होते. सासूला तिच्या आवडीची कारलीची भाजी करून खाऊ घालते.

सून :- कारलीची भाजी केलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.
सासू :- मला काय पुसते,बरीच दिसते
पुस आपल्या सासर्‍याला,सासर्‍याला.
सून :- मामाजी,मामाजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा,माहेरा.
सासरा :- मला काय पुसते,बरीच दिसते
पुस आपल्या नवर्‍याला,नवर्‍याला.
सून :- स्वामीजी,स्वामीजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा,माहेरा.

आणि मग प्राणप्रियेच्या प्रश्नाला नवरा उत्तरच देत नाही. नवरा काय म्हणतो हे गीतात लिहिलेच नाही. गीताचा दोन ओळीत थेट शेवटच करून टाकला आहे.

” घेतलीय लाठी, हाणलीय पाठी,
तुला मोठं माहेर आठवते,आठवते……!!”

गंगाधर मुटे
…………………………………….

7 comments on “भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-१

 1. बाप रे.. खरंच भयंकर आहे. आमच्या इथे मंगळागौर असते त्यातली गाणीही अशीच भयंकर असतात. अर्थात त्या गाण्यांचा काय दोष म्हणा पूर्वीची परिस्थिती, माणसंच भयंकर असायची. आणि मुख्यतः सासूने सुनेचा छळ केला नाही तर ती सासू कसली असले काहीतरी समज. त्या मानसिकतेतूनच ही गाणी जन्माला आली असणार.. 😦

 2. ह्या गाण्याच्या बाबतीत म्हणायचे तर आम्ही जेव्हा हे गाणे गायचो तेव्हा याचा शेवट गोड होता….
  म्हणजे भाजी वगैरे करून झाल्यानंतर सासू स्वत: सुनेची वेणी-फ़णी करून तिला माहेरी पाठवते….
  हा शेवट नव्यानेच ऐकला मी…
  बाकी तुमची वेब,तुमचा ब्लॉग मस्तच आहे…

 3. काही भागात या गाण्याचा असा गोड शेवट गायला
  जातो अशी मला माहीती मिळाली आहे.

  “आणा फणी घाला वेणी जाउद्या राणी माहेरा माहेरा
  आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा”

  धन्यवाद मैथीलीजी..!!

 4. सुंदर …खुप छान… समाधान वाटले.
  पुन्हा पुन्हा यावे वाटले.
  असेच लिहित रहा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s