प्राक्तन फ़िदाच झाले
प्राक्तन फ़िदाच झाले यत्नास साधताना
मोती पुढ्यात आले वाळूस गाळताना
शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जळताना
हलक्याच त्या हवेने का कोसळून जावा ?
हेका उगीच होता तो स्तंभ बांधताना
पिकल्या फ़ळास नाही चिंता मुळी मुळीची
दिसलेच ना कधीही हितगूज सांगताना
द्रव्यापुढे द्रवीतो का कायदा म्हणावा?
नेमस्त गांजलेले कानून पाळताना
आता ’अभय’ जगावे अश्रू न पाझरावे
आशेवरी निघावे ही वाट चालताना
गंगाधर मुटे
…………………………………………
(वृत्त – आनंदकंद )
………………………………………..
सर,फ़ारच सुंदर.
या कवितेला माझ्या एका लेखात वापरू का?
कृपया माझ्या ब्लॉगच्या एखाद्या पोष्टवर कॉमेंट टाकून मला कळवा.
मी तुमचा पंखा झालो आहे.एक नंबर लिहिला आहे.
-Shantanu Deo
http://maplechipaane.blogspot.com/