नशा स्वदेशीची…!!
आज रात्रीच्या मध्यात असे काय घडणार आहे?
जुन्याचा खातमा होऊन नव्याची स्थापना होणार आहे?
की व्यवस्थेचे शेंडाबूड परिवर्तन होणार आहे?
निराशेला बुडवून आशेला कोंब येणार आहे?
की उमेदीला भविष्य खांद्यावर घेणार आहे?
नेमके होणार तरी काय आहे?
फ़क्त हेच होणार की स्वप्नांचे मनोरे बांधले जाणार
आणि अवगुण गाळण्याचे संकल्प सोडले जाणार
मात्र अवगुण गळण्याऐवजी संकल्पच गळणार
तरीही आशा की… भविष्य उजळणार
अशा मंगल घटिकेला, चला एक एक ग्लास भरून घेऊ
पळू नका गांधीप्रेमींनो, आज थोडासा विचार करून घेऊ
ग्रामस्वराज,स्वदेशीचा अर्थ आज लागणार आहे
बदल्यात फक्त गावठीचा एक पेला मागणार आहे
इंग्रज गेल्यापासून म्हणा अथवा
किल्ल्यावर तिरंगा फडकल्यापासून म्हणा
कुठेतरी,कधीतरी, उजेडात वा अंधारात
आढळल्यात त्या महात्म्याच्या पाऊलखुणा ?
हमरस्त्यावर बेदरकारपणे आणि अगदी एकमताने
त्या ग्रामसुराज्याच्या संकल्पनेला फासलाय ना चुना ?
पण इथे ग्रामोद्योगाचा मूलमंत्र साकारलेला दिसतो
मोहाफुलापासुन गावठीचा सुंदर प्रकल्प आकारलेला दिसतो
सरकारला सबसिडी इथे कोणीच मागत नसते
शिपाई,कलेक्टर,मंत्री सर्वांना नियमित हप्ते जात असते
ग्रामस्वराज्याची संकल्पना पचनी पडत नाही कारण
भगतसिंगासारखी नशा आता कुणालाच चढत नाही
खुर्चीच्या दलालांनी नारळ असं कसं फोडलं
नियतीने क्रित्येकांना गुत्त्यावर आणून सोडलं.
थोडी गेली पोटात आता अभय पडू लागला गिअर
पिल्या-बिनपिल्यांनाही मेनी मेनी हॅपी न्यू ईअर………………..!!!!
………… **………….. **…………. **…………..**……..
namaskar,
tumchya kavita changlya ahet
vachun anand zala .
धन्यवाद आसारामजी