हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका

हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका

ऊठ मर्दा ऊठ
आवळून घे मूठ
हाण त्याच्या टाळक्यात
पायामधला बूट

सत्तेपुढे शहाणपण
जेव्हा व्यर्थ जाते
माणुसकीचे लचके तोडून
लाचखोर खाते
पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

अन्यायाची सीमा जेव्हा
मर्यादेला लांघते
तुझे हक्क तुडवून
तिरडीवर बांधते
शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

पोशिंद्याच्या छाताडावर
हरामींच्या मौजा
तेव्हा राज्य करतात
लुटारूंच्या फौजा
सत्ता आणि दलालांची, कर ताटातूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

माय तुझी बैलावाणी
राबराबून मेली
गल्लीमध्ये मुळं अन्
दिल्लीमध्ये वेली
अभयाने शोध घे, कोणी केली लूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

                                                      गंगाधर मुटे
————————————————-

आयुष्य कडेवर घेतो

आयुष्य कडेवर घेतो

झुंजूमुंजू पहाटेला, आभा चढे आभाळाला
काळोखाच्या भेगातुनी, सूर्य डोकावतो
गारठल्या पंखामधी, आशा जागवतो

सुन्यासुन्या शिवाराला, निजलेल्या आवाजाला
चेव येण्याला कोंबडा, दारी बांग देतो
सुस्तावल्या आळसाला दूर पांगवतो

अन्नासाठी चिलंपीलं, खोप्यामधी किलबिल
लेकराची साद येता, पान्हा जन्म घेतो
चोचीमधी ममतेला, चिंब भिजवतो

अभयता पेरताना, रुजलेली फुलताना
फळलेली पाहताना, जेव्हा आनंदतो
तेव्हा मीच आयुष्याला, कडेवरी घेतो

                                              गंगाधर मुटे
——————————————–

’पाकनिष्ठ’ कांदा, लुडबूडतो कशाला?

’पाकनिष्ठ’ कांदा, लुडबूडतो कशाला?

भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला
उध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला

कांदा पुसे रडूनी, कांद्यास अक्कलेच्या
तो ’पाकनिष्ठ’ कांदा, लुडबूडतो कशाला?

चेचून वेदनांना, पायात गाडले; पण
स्वप्नात भूत त्यांचे, रेंगाळते उशाला

दचकून जाग येते, निद्रा लयास जाते
ते घाव प्राक्तनाचे, छळती क्षणाक्षणाला

सोडून भूतळाला, ती दैत्य जात गेली
देऊन दान वृत्ती, या सभ्य माणसाला

ना झाकते कधी ती, वस्त्रात अंग सारे
मिळणार भाव कैसा, शेतीत कापसाला?

समजून घे “अभय” तू नाहीत भ्याड सारे
निपजेल शूर येथे, विश्वास दे उद्याला

                                गंगाधर मुटे
………………………………………..

पोळ्याच्या झडत्या… (१)

पोळा म्हणजे शेतकर्‍याचा मोठा सण. या दिवशी बैलांची शिंगे रंगवून,बेगड लावून बैलांना सजविले जाते. या दिवशी बैलांच्या खांद्यावर जू दिले जात नाही. कामाला अजिबात जुंपले जात नाही.
मग पोळा भरवून बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि मग सुरू होतात खड्या आवाजातील झडत्या.
“एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!” चा एकच जल्लोष होतो. त्यापैकी काही गाणी झडत्या संकलीत करून येथे द्यायचा प्रयत्न करणार आहे.
…………………………..
पोळ्याच्या झडत्या… (१)

चाकचाडा बैलगाडा,
बैल गेला पवनगडा
पवनगडाहून आणली माती
थे दिली गुरूच्या हाती
गुरूने बनविली चकती
दे माझ्या बैलाचा झाडा
मग जा आपल्या घरा

एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!
..
(संकलन : गंगाधर मुटे)
………………………………

आभाळ गडगडे

पोळ्याच्या झडत्या… (२)

आभाळ गडगडे, शिंग फ़डफ़डे
शिंगात पडले खडे
तुझी माय काढे तेलातले वडे
तुझा बाप खाये पेढे
.
एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!
..
(संकलन : गंगाधर मुटे)
………………………………

खांद्यावरी खार्‍या रे

खांद्यावरी खार्‍या रे….

खांद्यावरी खार्‍या रे ssss
शंकरराजा
घेतल्या काहून….
घेतल्या काहून.. घरचा वैताग पाहून sssss
.
एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!
..
(संकलन : गंगाधर मुटे)
………………………………

बरं झाल देवा बाप्पा…!!

(१९८५ मध्ये मी लिहिलेली माझी पहिली कविता.)

बरं झाल देवा बाप्पा…!!

सरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले
बरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ….॥धृ.॥

कर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी
कर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी
तरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ….॥१॥

कधी चालुनिया येते कहर अस्मानी
विपरीत शेतीधोरण कधी सुलतानी
कमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ….॥२॥

इंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले
शोषणाने शेतकरी खंगुनिया मेले
पोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले ….॥३॥

                                                 गंगाधर मुटे
………………………………………………………………………
(पूर्वप्रकाशित- शेतकरी संघटक “ग्रामीण अनुभूती विशेषांक”१९८५)
………………………………………………………………………

सजणीचे रूप

सजणीचे रूप …!!

रुपये पाहता लोचनी। सुखी झाली ती साजणी ॥१॥
म्हणे व्यापारी बरवा। म्हणे पगारी बरवा ॥२॥
शेती बागा त्याचे घरी। परी नको शेतकरी ॥३॥
ऐसे सजणीचे रूप। पदोपदी दिसे खूप ॥४॥
अभय म्हणे कास्तकारा। डोहामधी डुबक्या मारा ॥५॥

                                          गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….

बळीराजाचे ध्यान

बळीराजाचे ध्यान ….!!

सुंदर ते ध्यान उभे बांधावरी
नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥

कासे पितांबर ते फ़ाटके धोतर
टायरचे खेटर पायामधी..॥२॥

तुळशीहार जणू घामाचीच धार
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥

कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥

नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥

आरतीला नाही त्याची रखुमाई
चारतसे गाई माळरानी..॥६॥

राजा शेतकरी बळीराज यावे
संघटित व्हावे अभयाने..॥७॥

                          गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….

हक्कदार लाल किल्ल्याचे

हक्कदार लाल किल्ल्याचे…!

या देशाचे पालक आम्ही
सच्चे कास्तकार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ………..||धृ||

लढले बापू-लाल-बाल ते
सुराज्याच्या जोषाने
क्रांतीकारी शहीद झाले
रक्त सांडुनी त्वेषाने
स्वातंत्र्याचा लढा रंगला
चेतुनी अंगार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ………..||१|| 

विदेशींनी हक्क सोडता,
केला ताबा देशींनी
केवळ खुर्ची बदलून केले,
वेषांतर दरवेशींनी
परवशतेच्या बेड्या आम्हा,
कितीदा छळणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ………..||२|| 

शेतकर्‍यांच्या,कामकर्‍यांच्या,
पोशिंद्याच्या पोरा ये
फ़ुंकून दे तू बिगुल आता,
नव्या युगाचा होरा घे
भारतभूचे छावे आम्ही,
अभयाने झुंजणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ………..||३|| 
  
                            गंगाधर मुटे
…………………………………