टुकारघोडे! (हझल)

टुकारघोडे! (हझल)

गाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे टुकारघोडे हजार आहे

कशी बघा चालते कचेरी, अशी जशी की दुकानदारी
अनाथ सोडून कायद्याला, विधानमंडळ फ़रार आहे

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला
मुरूम गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे

गमावतो ना कधीच संधी सफ़ेद कुत्रा पिसाळलेला
डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे

कुठून आणू नवीन गजरा, दुकान शोधू कुठे नव्याने?
सरून पर्याय सर्व गेले, जुनीच देणी उधार आहे

परंपरा-वंश लाभ ज्यांना, इथे तयांनाच ’अभय’ आहे
फ़िरोजघरचे गिधाड-कुत्रे, नेमून येथे हुशार आहे

                                                     - गंगाधर मुटे
—————————————————

गाणे बदनाम वाले

गाणे बदनाम वाले


कोण्या एका गावामाजी । वार्ता एक मिळाली ताजी ॥
की कोणी साधू बुवा संताजी । गावामध्ये प्रवेशले ॥१॥

वार्ता पसरता सार्‍या नगरी । गोळा होय सभ्य गावकरी ॥
म्हणती घ्यावा सप्ताह तरी । आता सत्संगाचा ॥२॥

त्यात एक सद्‍गृहस्थ । म्हणे होणार जगाचा अस्त॥
भक्तीमार्गे जावे समस्त । मोक्षप्राप्ती मिळविण्या ॥३॥

सल्ला असा ध्यानी भरला । की भक्तीमार्गे गेला तो तरला ॥
नाहीतर नरकामध्ये चरला । भोगवादी जाणावा तो ॥४॥

ठराव केला एकमताने । आणि गाठला स्वर्ग सुताने ॥
मग उभारले शामियाने । व्यासपिठ भव्यही ॥५॥

पारायणाची पाहती वाट । तिथे गर्दी झाली अफ़ाट ॥
पुजेचेही आणिले ताट । पण बुवा काही येईना ॥६॥

मग कुणाला आली शंका । अफ़वेनेही लूटली लंका ॥
त्यातच कोणी पिटवला डंका । की बुवा पळाले रे ॥७॥

एक नास्तिक संधी साधून । बोलून गेला गहिवरून ॥
घेऊ थोडी ’सिरियल’ पाहून । येईस्तोवर बुवाजी ॥८॥

मग वेळ लावियेला सार्थकी । टीव्हीत नाचत होती नर्तकी ॥
तिने वेधिले चित्त सर्व की । तमाम आपुल्याकडे ॥९॥

पारायणास भुलून गेले । नृत्यांगनेस जवळ केले ॥
ठेका धरूनी नाचू लागले । भावविके भक्तही ॥१०॥

आता मुन्नीचे नाम आले । बुवा झेंडूबाम झाले
गाणे बदनाम वाले । भारतभर फ़ेमस झाले ॥११॥

गंगाधर मुटे
………………………………………………………

‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

                            श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.

                            मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ देवांग, कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार मा. वामनराव चटप, माजी आमदार मा. सरोजताई काशीकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला अंदाजे दिड लाख शेतकरी उपस्थित होते.

‘रानमेवा’

                      ११२ पृष्ठे असलेल्या ‘रानमेवा’ या कविता संग्रहात कविता, गझल, लावणी, विडंबन, तुंबडीगीत, अंगाईगीत, बालकविता, बडबडगीत, देशभक्तीगीत आणि नागपुरी तडका या काव्यप्रकांरातील रचनांचा समावेश आहे. 
                    ‘रानमेवा’ या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ. श्रीकृष्ण राऊत, ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, श्री मुकुंददादा कर्णिक, श्री गिरीश कुळकर्णी, जयश्री कुळकर्णी-अंबासकर, छाया देसाई, डॉ भारत करडक, अलका काटदरे, स्वप्नाली गुजर आणि श्री अनिल मतिवडे यांचे अभिप्राय लाभले असून पुस्तकाची किंमत रू. ६०/- आहे.

* ‘रानमेवा’ पीडीएफ़ स्वरूपात हवे असल्यास आपला ईमेल पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर पाठवावा.

* पोष्टाने पुस्तक हवे असल्यास कृपया आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर किंवा कॅम्पस प्रकाशन, आर्वी छोटी त. हिंगणघाट जि. वर्धा या पोष्टाच्या पत्त्यावर पाठवून मागणी नोंदवावी. 

* मुल्य म.ऑ ने किंवा चेकने पाठवले तरी चालेल. किंवा बॅंक खात्यात जमा करता येऊ शकेल. त्यासाठी संपर्क करावा. 

* मुळ किंमत पाठवावी. पोस्टेज खर्च प्रकाशकाकडे.

‘रानमेवा’ ऑनलाइन स्वरूपात येथे वाचता येईल.

धन्यवाद!

.                                                            आपला स्नेहांकित
.                                                               गंगाधर मुटे
…………………

रानमेवाचे विमोचन करतांना मा. शरद जोशी.


…………………

…………………

sharad joshi

रानमेवाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी.


…………………
Gangadhar Mute

रवि देवांग,शरद जोशी,इंद्रजीत भालेराव,गंगाधर मुटे,अ‍ॅड उमरीकर इत्यादी


…………………..
शरद जोशी

रानमेवाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी.


…………………..
गंगाधर मुटे

थोडा हास्यविनोद.


……………………
गंगाधर मुटे

उपस्थित जनसमुदाय.


…………………..

छातीचं झाकण बोम्लीवर आलं

छातीचं झाकण बोम्लीवर आलं

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं …… !!

चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते
टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते
सभ्यतेची अभिरुची लईच दिसते न्यारी
अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी
आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं …… !!

जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे
चार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे
जे काही करे ते अंधारात करे
उजेडात मात्र इज्जतीले मरे
आता उजेड काय, अंधार काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं …… !!

कालेजचे तोतामैना वर्गात नाय दिसत
आडमार्गी झाडाखाली बसते दात किसत
जनाची लाज ना मनाले खंत
खुलेआम प्रेमलीला, नाही त्याले अंत
आता दिवस काय, रात्र काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं …… !!

शायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात
बिनावार्‍यानं झुडपं तिथं, खल-खल हालतात
झुडपाच्या आडोशाला दोन पाखरं बसते
“प्रेम” या शब्दाचे धिंडवडे नुसते
आता भय काय, अभय काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं …… !!

                                         गंगाधर मुटे
————….————–….————–
..ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा..
————….————–….————–

सरींचा कहर

सरींचा कहर

पावसाची सर
प्रेमाला बहर
पण गळतेया घर
गरीबाचे

सरींचा कहर
प्रेमाला बहर
पण फुटतोया नहर
धरणाचा

सरींचा कहर
प्रेमाला बहर
पण बुजलाय दर
उंदराचा

सरींचा कहर
प्रेमाला बहर
पण डुबलेय शहर
पुराखाली

सरींचा कहर
प्रेमाला बहर
बगळा जमिनीवर
उताना

सरींचा कहर
प्रेमाला बहर
पण जीवाला घोर
या सरींचा

सरींचा कहर
प्रेमाला बहर
पाय घसरून कमर
लचकली.

सरींचा कहर
प्रेमाला बहर
वाहून गेलाय खरं
कुंभाराचा

सरींचा कहर
प्रेमाला बहर
पण थंडीने वानर
कुडकुडले.

सरींचा कहर
कोसळले छप्पर
मदत येईस्तोवर
जीव गेला

गंगाधर मुटे
………………………………………
उंदराचा दर म्हणजे उंदराचे बीळ
………………………………………

नाकानं कांदे सोलतोस किती?

नाकानं कांदे सोलतोस किती?


तुझा अभ्यास किती, तू बोलतोस किती
नाकानं कांदे सोलतोस किती?

तुझी नशा किती, तू डोलतोस किती
नाकानं डांगरं तोलतोस किती?

तुझा व्यायाम किती, तू पेलतोस किती
नाकावर भेद्रं झेलतोस किती?

तुझी मेहनत किती, तू राखतोस किती
नाकानं टेंभरं चाखतोस किती?

तुझे योगदान किती, तू लाटतोस किती
नाकानं गाजरं वाटतोस किती?

तुझी सत्ता किती, तू येलतोस किती
नाकानं आलू छिलतोस किती?

तुझी भूक किती, तू गिळतोस किती
अभयानं जनता पिळतोस किती?

                                   गंगाधर मुटे
……………………………………..
ढोबळमानाने शब्दार्थ-
डांगरं = खरबुज.
भेद्रं = टमाटर,टोमॅटो.
टेंभरं = टेंभुर्णीचे फ़ळ.
राखणे = रखवाली करणे या अर्थाने.
येलणे = वेल्हाळणे.
…………………………………….

मांसाहार जिंदाबाद

मांसाहार जिंदाबाद …!!


सोने गं सोने, रांधल्या का तुने
बेडूकाच्या खुला
खेकड्याची आमटी
अन् गांडूळाच्या शेवया…!!

गोचिडाची खिचडी
टमगिर्‍याचं भरीत
डासाचा अर्क घे
घुबडाच्या तर्रीत
जरासा सुरवंट, थोडेसे ढेकूण
घे पुरणात भराया …..!!

गोमाश्यांचा लाडू कर
त्याला सरड्याचा रंग दे
उवा-टोळ पिळूनी
सापा-विंचवाचा पाक घे
उंदराची चटणी, पालीची सलाद
घे तोंडास लावाया ….!!

कोंबडी नी बकरी
निरुपद्रवी जनावर
तुझ्या जिभेचे चोचले
उठती त्यांच्या जीवावर
गरिबाला सुळी, शत्रूला अभय
का करीशी अन्याया?….!!

                             गंगाधर मुटे
………… **………….. **………….

बिपाशाले लुगडं

बिपाशाले लुगडं 

श्याम्यानं इचीबैन, कहरच केला
बिपाशासाठी मुंबईले, लुगडं घेऊन गेला ….॥१॥

त्याले वाटलं मायबाप, भलते गरीब असन
म्हून तिले आंगभर, कपडे भेटत नसन
वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते
इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघडं पडते
म्हून त्यानं कपड्याचा, थैला भरून नेला ….॥२॥

जुहूच्या चौपाटीवर, भेट त्यायची झाली
तिले पाहून शाम्याची, बंदी विकेट गेली
तिले म्हणे चोळी घाल, घे लुगडं नेसून
थ्ये म्हणे आवमाय, हे भूत आलं कुठून?
मंग जुहूवर धमासान, तमाशा सुरू झाला ….॥३॥

लय वळवलं तिचं मन, पण मन नाय वळे
मंग श्याम्या धावे मांगं, आनं थ्ये पुढं पळे
वन्समोअर,वन्समोअर, लोकं भाय बोंबले
कॅमेरेवाले पोझ घेऊन, कॅमेरे रोखून थांबले
पोलीसायनं बैनमाय, नावकूल विचका केला
आनं त्याच्या पुढचा एपीसोड, राहूनच गेला ….॥४॥

                                                  गंगाधर मुटे
……………………………………………………………
ढोबळ मानाने शब्दार्थ :-
इचीबैन, बैनमाय = च्यायला सारखे.
वाढलीहूढली = वयात आलेली. बंदी = पूर्णं,संपूर्ण.
आवमाय = अगबाई, मांगं = मागे नावकूल = पुर्णपणे.
…………………………………………………………..
………………………………………
ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा.
……………………………………….
.

अस्सल देशी हायकू(?)

अस्सल देशी हायकू(?)

हायकू हा एक मस्त काव्यप्रकार, मुळचा जपानी (असे म्हणतात)
हा प्रकार मला खुप आवडला.
हायकूच्या तंत्राबद्दल पुरेशी माहीती व्हायचीय.
होईल यथावकाश. तोपर्यंत…
अस्सल देशी हायकू(?) सादर.

१)
टीव्ही,मि़क्सर,बाईक जापानी
आता हायकुही जापानीच
फ़क्त बायकू तेव्हडी भारतिय उरली. :(
२)
त्याला बघून वेणी थरथरली
डोळ्यातून आसवे गळली
सुपारी लागली असेल बहुतेक.
३)
डांबर,सिमेंट,गिट्टी खायची नसते
आहार शास्त्रात बसत नाही
पोटविकार-तब्बेतीस हानीकारक असते.
४)
जन्मास घालतांना विधात्याने माझेसमोर दोन पर्याय ठेवलेत.
टाळकी की टवाळकी….??
मला टाळक्याची गरज नव्हती… मी टवाळकी निवडला.
काही चुकलय माझं…??? :) :)
५)
आडदांड सोसाट्याचा वारा सुटला तेव्हा
ढगांनी आकाशात गर्दी करून जाळे विणले.
हवेच्या रेट्याने चंद्र घसरला तर तो जमिनीवर पडू नये म्हणुन. :D

गंगाधर मुटे