शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार

शेतकरी संघटनेचे प्रणेते

मा. शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

                मुंबईतील ‘चतुरंग प्रतिष्ठान’ संस्थेचा या वर्षीचा सामाजिक क्षेत्रासाठी असलेला ‘जीवनगौरव’ पुरस्कार शेतकरी संघटनेचे नेते श्री. शरद जोशी यांना प्रदान करण्यात आला. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, सर्वदूर पसरलेल्या शेतकर्‍यांची मोठी संघटना बांधण्याचा आणि त्यांच्या शेतीविषयक बहुविध प्रश्नांची तड लावण्यासाठी कृतिशील चळवळ उभारण्याचा जो ध्यास श्री. शरद जोशी यांनी आयुष्यभर धरला, त्यासाठी अथक प्रयत्न केले, शेतीमालाला वाजवी भाव मिळावा, शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात, त्यांच्या प्रश्नांचा साकल्याने विचार साहित्य प्रस्तृत करून समाजमनात शेतकरी बांधवाविषयी जागृती निर्माण व्हावी, तसेच ग्रामीण महिलांही संघटित होऊन कार्यरत व्हाव्यात अशा बीजस्वरुपी समाजकार्याचा विचार करून कृतिशील चळवळ उभारणार्‍या त्यांच्या जीवनध्येयाचा आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमी कार्याचा आम समाजातर्फे सामाजिक जाणीवेतून कृतज्ञतापूर्वक गौरव व्हावा, या भावनेने चतुरंग प्रतिष्ठानने यंदाचा सामाजिक ‘जीवनगौरव’ पुरस्कार श्री. शरद जोशी यांना मुलुंड, मुंबई येथील कालिदास नाट्यगृहात १८ डिसेंबर २०१२ रोजी संपन्न झालेल्या भव्य संमेलनात प्रदान करण्यात आला. उपस्थितांनी सुमारे पाच मिनिट उभे राहून प्रचंड टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट करून मा. शरद जोशींना मानवंदना दिली.

               यावेळी शरद जोशी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतांना श्री अनंत दीक्षित म्हणाले की, आजची ही संध्याकाळ देशाच्या दृष्टीने मौलिक अशी आहे. “एकच दिसतो समोर तारा, परी पायतळी अंगार’’ असे कवी कुसुमाग्रजांनी म्हटलेय, आज शरद जोशींना दिला जाणारा चतुरंग पुरस्कार लोकांमधून आलेला असल्याने हा पुरस्कार मोठा आहे, या पुरस्काराला औचित्य आहे; तरी देखील शरद जोशींचा देशपातळीवर मोठा गौरव होण्याची आवश्यकता होती, असे मला वाटते. अर्थात गौरव, पुरस्कार, समारंभ व मान्यता याच्या पलीकडे ते गेलेले आहेत.

              इंडिया विरुद्ध भारत या संकल्पनेने पेटंट शरद जोशींनी घ्यावे, अशा तर्‍हेची मूलभूत संकल्पना त्यांनी समाजाला दिली. एकीकडे बदलणारा भारत दिसतो, एकीकडे न बदलणारा भारत दिसतो; एकीकडे इंडियात अनूवीज ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याची भारताची ताकद किती आहे, हे सांगितले जाते तर दुसरीकडे भारतात गाव हागणदारी मुक्त करण्यार्‍या योजनांची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू असते. हा जो भारत आहे, त्या भारताचे दुखणे आणि नासणे कशात आहे, हे सांगणे फार अवघड आहे. अशा या आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये गौरवशाली व प्रभावशाली कार्य शरद जोशी यांनी केले आहे. समाज पुढे यावा यासाठी प्रसंगी अपयशांना देखील सामोरे जाऊन आयुष्यभर काम करणे जिकिरीचे जरी असले तरी शरद जोशींनी यशस्वीपणे निभावले आहे.

                तीस वर्षापूर्वी निपाणीला जेव्हा तंबाखूचे आंदोलन झाले, तेव्हा मला जोशींच्या कार्याविषयी पहिल्यांदा जवळून ओळख झाली. जन्म कुणाच्या पोटी घ्यावा, हे कुणाच्या हातात नसते. पण आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीच्या इतिहासामध्ये शरद जोशींचा जन्म कोणत्या जातीत झालेला आहे, हा प्रश्न बहुजन समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलेला नाही. या अनुषंगाने महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केला तर ज्यांच्या बाबतीत जन्म कोणत्या जातीत झालेला आहे, हा प्रश्न बहुजन समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलेला नाही, असे पहिले नाव म्हणजे श्री दांडेकर, दुसरे श्रीपाद डांगे, तिसरे आचार्य प्र.के. अत्रे आणि चौथे नाव म्हणजे शरद जोशी. शरद जोशींचे अनेक भाषांवर प्रभुत्व आहे. जितक्या सहजतेने ते शेतकरी समाजाशी मराठीमध्ये संवाद साधतात तितक्याच सहजतेने त्यांनी फ्रेंच भाषेमध्ये विदेशात भाषणे केलेली आहेत. त्यांना संस्कृतचे व्यासंगी प्राध्यापक व्हायचे होते. खरे तर शरद जोशी हे अलौकिक व्यक्तिमत्त्व आहे. हा मनुष्य शब्दाने, वर्णनाने किंवा वाचनाने समजेलच असेही नाही. हे व्यक्तिमत्त्व कुठल्यातरी साच्यात बसवता येणे कठीण आहे. सगळ्याच गोष्टी आयुष्यात शब्दांना झेपतातच असे नाही, त्याला कृतिशीलतेची सांगड असावी लागते. महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आणि चंदिगढ पासून उत्तरप्रदेशापर्यंत विविध शेतकरी आंदोलनांचे नेतृत्व करणे हे काम वाटते तेवढे सोपे नाही. अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्राचा उपयोग करून या शेतकरी योद्ध्याने अनेक चमत्कारिक गोष्टी लीलया साध्य केलेल्या आहेत. मोठमोठ्या अर्थशास्त्र्यांना समजायला कठीण जाईल असे अर्थशास्त्र शेतकर्‍यांना अगदी सहजतेने समजावून सांगण्याचा चमत्कार शरद जोशींनी घडवून आणला आहे. वारकरी संप्रदायाच्या भाषेत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की “सोप्यात सोपी गोष्ट कारण नसताना अवघड करून सांगतात त्यांना विद्वान असे म्हणतात” आणि “अवघडातील अवघड गोष्ट जे सोपी करून सांगतात, त्यांना संत असे म्हणतात.” हा संतत्वाचा प्रभाव शरद जोशींमध्ये आहे म्हणूनच त्यांना ऐकायला लाखोंनी महिला देखील स्वखर्चाने त्यांच्या भाषणाला गर्दी करतात. भाषिक दृष्ट्या अस्मिता हरवलेला आणि दुभंगलेला समाज, जात, धर्म, भाषा, प्रांत आणि प्राचीन धर्म-परंपरेच्या अस्मिता दर्शक गोष्टीपासून पूर्णपणे अलिप्त राहणारा पण रोजच पराभूत होणारा सामान्य माणूस जात-भाषा-धर्मवादी नाही, ही भूमिका जाहीरपणे घेऊन लोकसंगठन करण्याचे ऐतिहासिक कार्य शरद जोशी यांनी महाराष्ट्रात केलेले आहे.

                कुठल्याही विषयावर मूलभूत आणि मूलगामी विचार करणे, हे आजच्या विचारप्रक्रियेच्या बाजारपेठेत अडचणीचे ठरत चाललेले असताना, लोकांना रुचेल तेच बोलायचे, अशी सर्वसाधारण पद्धत रूढ झालेली असल्यामुळे आपण आपली स्वतःची ओळख करून घेणेच विसरून गेलो होतो. अशा विपरीत स्थितीत शरद जोशींनी समाजाला स्वतःची ओळख करून घ्यायचे शिकविले, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने फार मोलाची बाब आहे. शरद जोशी म्हणतात की, प्रत्येक अनन्यसाधारण व्यक्ती ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे आपले जाणीवांचे आणि अनुभवांचे जग व्यापक करण्याच्या धडपडीत असतो. आयुष्य विविधतेने संपन्न व्हावे, निवड करण्याची संधी क्षणाक्षणाला मिळावी आणि प्रत्येक निवडीच्या वेळी अनेक विकल्प उपलब्ध व्हावेत, याचा शोध घेण्यासाठी मनुष्यप्राणी धडपडत असतो आणि हा शोध स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणारा असतो. शरद जोशी असेही म्हणतात की, सत्यापेक्षा स्वातंत्र्याचे मोल जास्त असते. इतिहासाकडे बघितले तर असे दिसून येते की, समाजाला स्वतःचे योग्य स्थान मिळवून देण्याच्या महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. आंबेडकर यांनी सुरू केलेल्या लढाईच्या रणांगणातील शरद जोशी हे श्रेष्ठ लढवय्ये आहेत.

               सत्काराला उत्तर देताना शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी म्हणाले की, आज मला बरेच दिवसानंतर काठीचा आधार न घेता स्वतःच्या पायावर उभा राहून बोलताना पाहून माझ्या सर्व शेतकरी सहकार्‍यांना आनंद वाटत असेल. अलीकडे मला उठून उभेही राहता येत नाही, खुर्चीवर बसून बोलत असतो पण आज मी सर्वांना सांगतो की, जोपर्यंत हिंदुस्थानातील सगळे शेतकरी संपूर्णतः: कर्जमुक्त होत नाहीत तोपर्यंत मी डोळे कदापि मिटणार नाही.

               माझ्या संबंध सामाजिक कार्याची सुरुवात मी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जेव्हा “सेकंड डेव्हलपमेंट डिकेड” म्हणजे त्यांच्याकडे पंचवार्षिक योजनांऐवजी दहा वर्षाच्या योजना असतात, त्या समितीचा मी सदस्य होतो, तेथूनच झाली. त्या समितीच्या सदस्याच्या भूमिकेतून मी वेगवेगळ्या विशेषकरून लॅटीन अमेरिका आणि आफ्रिकेतील अनेक देशांचा दौरा केला तेव्हा हिंदुस्थानातील शेतकरी निरक्षर, आळशी आणि व्यसनी आहे शिवाय लग्नप्रसंगी वगैरे अनावश्यक प्रचंड खर्च करतो म्हणून हिंदुस्थानातील शेतकरी गरीब आणि कर्जबाजारी आहे असे हिंदुस्थानासहित युरोपातील शेती संबंधातील सर्व पुस्तके सांगत होती. सर्व अर्थशास्त्र्यांमध्ये अशा तर्‍हेच्या कुभांड रचणार्‍या विचारांना मान्यता होती. अशा कुभांडी विचारांना खोडून काढण्याचे ऐतिहासिक कार्य माझ्या हातून घडले, हे विनम्रतेने मी मान्य करतो.

              शेतकरी संघटनेच्या प्रारंभीच्या काळात मी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये जात असे आणि नेहरूंच्या समाजवादी धोरणांमुळे हे सर्व संकट भारतावर कोसळले आहे असे सांगत असे. शेतीचे शोषण केल्याखेरीज समाजवादी उद्योगधंद्याचे पोषण होणार नाही अशी समाजवादी विचारसरणी बाळगून पंडित नेहरू असमतोलाच्या दिडदांडी तराजूच्या आधाराने औद्योगिक विकास साधण्यासाठी शेतीतील कच्च्या मालाचे शोषण करीत आहे, असे मी त्यावेळी सांगत असे आणि शेतीमालाला रास्त भाव हा एककलमी विकासाचा व गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे, असे मी फार आग्रहाने मांडत असे.

              जपानी लोकांमध्ये खूप देशभक्ती आहे म्हणून जपानी लोक श्रीमंती आणि वैभवाकडे गेलेले नाहीत तर १९२१ सालापासून जपानमध्ये तयार होणार्‍या भाताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असणार्‍या भावापेक्षा पाचपट अधिक भाव मिळत आहे. त्यामुळेच तेथील शेतकर्‍यांच्या हातात पैसे आले आणि त्यातूनच तेथील शेतकर्‍यांनी छोटेछोटे गृहउद्योग सुरू केलेत. नंतर त्या गृहउद्योगात तयार झालेल्या वस्तूंच्या जोडणीचे कारखाने सुरू झालेत आणि त्यातूनच त्या देशाचा औद्योगिक विकास झाला. आजही जपानमध्ये टोयाटोसारखे मोठमोठे कारखाने गावात पाहायला मिळतात. कारखानदारीच्या विकासाकरिता जपान्यांना कधी शहराकडे धाव घेण्याची गरज पडली नाही. शेतमालाला भाव मिळाला पाहिजे हे जपानमध्ये अगदी १९२१ सालापासूनच मान्य करण्यात आले. नंतर चीननेही  अशाच तर्‍हेच्या धोरणांचा अंगिकार केला; मात्र पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानात शेतीचे मरण ठरेल अशाच तर्‍हेचे धोरण आखल्या गेले. शेतीमालाला रास्त भाव मिळताच कामा नये, अशा तर्‍हेचे अधिकृत धोरण पंडित नेहरूंनी राबविले. दुसर्‍या पंचवार्षिक योजनेच्या दस्तावेजात आजही याचे अधिकृत पुरावे उपलब्ध आहेत.

              अशा तर्‍हेचे धोरण राबविल्या गेल्यामुळेच शेतमालाला रास्त भाव मिळाला नाही आणि शेतकरी कर्जात बुडाला. आज देशात शेतकरी आत्महत्या होत आहे त्यात कापूस उत्पादक शेतकर्‍यांची संख्या फार मोठी आहे. शेतकरी आत्महत्यांची संख्या कापूस उत्पादक क्षेत्रात जास्त आहे कारण शेतमालाचा विचार करता सगळ्यात जास्त लूट कापूस या पिकाची झाली आहे. जर का आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव २१० रुपये असतील तर हिंदुस्थानात कापसाला कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया १०० रुपयापेक्षा जास्त भाव दिले नाही. महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्षे कापूस एकाधिकार योजनेखालीच कापसाची खरेदी होत असल्याने विदर्भातील शेतकर्‍यांना ६० रुपयाच्या वर कधीच भाव मिळाले नाहीत. जगाच्या बाजारपेठेत २१० रु. भाव असताना विदर्भात कापसाला केवळ ६० रुपयेच मिळाल्याने विदर्भातील शेतकर्‍यांवर आत्महत्येचे संकट ओढवले आहे. आतापर्यंत एक लक्ष साठ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. याला वंशविच्छेद असा शब्द वापरता येईल. असा वंशविच्छेद होऊनही अजूनपर्यंत शहरातील कोणत्याही माणसात याविषयी थोडीसुद्धा कणव निर्माण झाली नाही. याविषयी आपले काहीतरी चुकत असावे, आपण विचार करायला हवा.

              गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि त्यासाठी ग्रामीण महिलांना काही किलोमीटर अंतरावरून डोक्यावर घागर घेऊन पाणी आणावे लागते, हा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही गावाच्या मध्यभागी एक हौद बांधावा आणि त्यात मोटर पंपाच्या साहाय्याने पाणी आणून सोडावे, जेणेकरून महिलांचे जगणे सुसह्य होईल, असा विचार करून कामाला लागलो तेव्हा त्याच गावातील एक म्हातारी आजीबाई येऊन माझ्या बायकोला म्हणाली की, बाई तुम्ही सर्व करा पण पाण्यासाठी गावात हौद बांधू नका कारण सध्या सासुरवाशीण मुलींना आपसातले दु:ख एकमेकींजवळ व्यक्त करायला निदान पाणवठा ही एकतरी जागा उपलब्ध आहे. तुम्ही जर हौद बांधला तर त्यांची आपसातील दु:ख व्यक्त करण्याची एकमेव जागाही कायमची बंद होईल.

              मी शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळायला हवे, अशी मांडणी केली तेव्हा सुरुवातीला खूप वादविवाद झालेत. उत्पादन खर्च कुणी व कसा काढायचा याविषयीही उहापोह झाला तेव्हा शेतीमध्ये जे उर्वरक, बियाणे, कीटनाशके लागतात त्याचा एक इंडेक्स तयार करावा असे काहींनी मांडले. मला मात्र शेतीमालाचा उत्पादनखर्च सरकारी यंत्रणांनी काढावा, हे अजिबात पटत नाही कारण शेतमालाला रास्त भाव न मिळण्यात सरकार हाच सर्वात मोठा अडसर आहे. सरकार समस्या क्या सुलझाये, सरकार यही समस्या है।
कोणत्याही बाजारपेठेमध्ये जर पूर्णपणे खुली व्यवस्था असेल आणि त्यात अनावश्यक सरकारी लुडबुड नसेल, केव्हाही शेतमालाची निर्यातबंदी करायची, वाटेल तेव्हा आयात करून शेतमालाचे भाव पाडायचे, अशा तर्‍हेचे उपद्व्याप जर सरकारने केले नाहीत आणि त्याच बरोबर शेतमालाच्या प्रक्रियेवरती, वाहतुकीवरती जर सरकारने बंधने लादली नाहीत तर या व्यवस्थेत मिळणारी किंमत शेतकर्‍यांना मान्य होण्यासारखीच असेल याची मला खात्री आहे.

               डॉ. अरुण टीकेकर यांचे अध्यक्षतेखालील डॉ. द.ना.धनागरे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री. अविनाश धर्माधिकारी, श्री. सुधीर जोगळेकर आणि सौ. प्रफ़ुल्ला डहाणूकर या मंडळींनी यंदाच्या २१ व्या जीवनगौरव पुरस्काराच्या निवड समितीचे कामकाज पाहिले. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लक्ष रुपये असे पुरस्कार स्वरूप असलेला हा जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी सामाजिक क्षेत्रासाठी श्रीमती इंदिराबाई तथा मावशी हळंबे (१९९२), डॉ. इंदुमती गोवर्धन पारिख (१९९५), श्रीमान पांडुरंगशास्त्री आठवले (१९९९) आणि श्रीमान नानाजी देशमुख (२००३) आणि सौ. साधनाताई आमटे (२००७) या मान्यवरांना देण्यात आला होता.

               ’जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान सोहळ्याला डॉ. अरुण टिकेकर, श्री अनंत दीक्षित, डॉ. द.ना. धनगरे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री सुधीर जोगळेकर, श्री अविनाश धर्माधिकारी, सौ. प्रफ़ुल्ला डहाणूकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नरेंद्र बेडेकर यांनी तर मानपत्र वाचन श्री तुषार दळवी यांनी केले.

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुधीर जोगळेकर, गौरवपर भाषण श्री अनंत दीक्षित, अध्यक्षीय भाषण डॉ. अरुण टिकेकर तर समारोपीय आभार प्रदर्शन श्री विद्याधर नेमकर यांनी केले.

                                                                                                                                                                           - गंगाधर मुटे
————————————————————————————————————————————————– sharad Joshi 

————————————————————————————————————————————————–
Sharad Joshi 
————————————————————————————————————————————————–
शरद जोशी 
————————————————————————————————————————————————–
शरद जोशी 
————————————————————————————————————————————————–
शरद जोशी 
————————————————————————————————————————————————–

(छायाचित्र श्री अरुण दातार यांच्या सौजन्याने)
 

मी मराठी – स्पर्धा विजेती कविता

कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?

किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे

कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?

“घराणे” उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे

जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?

कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे…!

                                                                               गंगाधर मुटे
—————————————————————————-
कविता/गझल                                                    वृत्त – सुमंदारमाला
लगावली – लगागा लगागा लगागा लगागा, लगागा लगागा लगागा लगा
—————————————————————————-

                   १ एप्रिल २०११ ते १५ मे २०११ या कालावधीत मी मराठी.नेट (http://www.mimarathi.net) ने कविता स्पर्धा २०११ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल १५७ स्पर्धकांनी प्रवेशिका भाग घेतला होता.
                  या स्पर्धेचा आज दि. १० सप्टेंबर २०११ रोजी निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत माझी वरील कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? ही  कविता प्रथम क्रमांक विजेता ठरली आहे.
             दुरवर ग्रामीण भागात अडगळीत पडलेल्या माझ्यासारख्या  एका शेतकरी माणसाची कविता पुरस्कृत करून माझ्यामध्ये या स्पर्धेने एक नवा आत्मविश्वास जागविला आहे.
             त्याबद्दल  माझ्या कवितेला व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या या आंतरजालीय विश्वाच्या निर्मात्याला, संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मराठीचे मालक या नात्याने राज जैन यांना,  ज्येष्ठ पत्रकार-लेखक-गझलकार असलेले परीक्षक श्री प्रदीप निफाडकर यांना,  तसेच
            माझ्या कवितेला फुलविण्यात मोलाचा हातभार लावणार्‍या तमाम आंतरजालावरील प्रतिसादकांना
मी मन:पूर्वक अभिवादन करतो. :)
                                                                                                                         – गंगाधर मुटे

———————————————————————————————————————–

श्री शरद जोशी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार

श्री शरद जोशी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार
                    मुंबईतील ‘चतुरंग प्रतिष्ठान’ संस्थेच्या या वर्षीच्या सामाजिक क्षेत्रासाठी असलेल्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी, निवड समितीने शेतकरी संघटनेचे नेते श्री. शरद जोशी यांची निवडक केली आहे. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, सर्वदूर पसरलेल्या शेतकर्‍यांची मोठी संघटना बांधण्याचा आणि त्यांच्या शेतीविषयक बहुविध प्रश्नांची तड लावण्यासाठी कृतिशील चळवळ उभारण्याचा जो ध्यास श्री. शरद जोशी यांनी आयुष्यभर धरला, त्यासाठी अथक प्रयत्न केले, त्या त्यांच्या जीवनध्येयाचा आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमी कार्याचा आम समाजातर्फे सामाजिक जाणीवेतून कृतज्ञतापूर्वक गौरव व्हावा, या भावनेने चतुरंग प्रतिष्ठानच्या यंदाच्या सामाजिक ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी श्री. शरद जोशींची निवड करीत असल्याचे निवड समितीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

                   शेतीमालाला वाजवी भाव मिळावा, शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात, त्यांच्या प्रश्नांचा साल्याने विचार साहित्य प्रस्तृत करून समाजमनात शेतकरी बांधवाविषयी जागृती निर्माण व्हावी, तसेच ग्रामीण महिलांही संघटित होऊन कार्यरत व्हाव्यात अशा बीजस्वरुपी समाजकार्याचा विचार या निवडीमागे असल्याचे समितीने म्हटले आहे.

                        डॉ. अरुण टीकेकर अध्यक्षतेखालील डॉ. द.ना.धनागरे, डॉ. तात्याराव लहाणे, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री. अविनाश धर्माधिकारी, श्री. सुधीर जोगळेकर आणि सौ. प्रफ़ुल्ला डहाणूकर या मंडळींनी यंदाच्या २१ व्या जीवनगौरव पुरस्काराच्या निवड समितीचे कामकाज पाहिले.

                         मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लक्ष रुपये असे पुरकार स्वरूप असलेला हा जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी सामाजिक क्षेत्रासाठी श्रीमती इंदिराबाई तथा मावशी हळंबे (१९९२), डॉ. इंदुमती गोवर्धन पारिख (१९९५), श्रीमान पांडुरंगशास्त्री आठवले (१९९९) आणि श्रीमान नानाजी देशमुख (२००३) आणि सौ. साधनाताई आमटे (२००७) या मान्यवरांना देण्यात आला आहे.

                       हा पुरस्कार स्वीकारण्यास श्री. शरद जोशी यांनीही सानंद संमती दिली असून डिसेंबर २०११ मध्ये मुंबईत होणार्‍या चतुरंग रंगसंमेलनात श्री. शरद जोशी यांना तो प्रदान करण्यात येईल.

——————————————————————————————————

स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo





स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo

स्टार माझा TV द्वारा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये ब्लॉग माझा-३ या ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेचे निकाल जाहिर झाल्यानंतर २७ डिसेंबर २०१० रोजी स्टार माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचा रेकॉर्डेड वृतांत सादर करताना खरोखरच खूप आनंद होत आहे. सदर कार्यक्रमाचे अपलोड करण्याच्या सोयीने ५ भागात विभाजन करण्यात आले आहे.
TV वरील कार्यक्रम रेकॉर्ड करून त्याच्या व्हिडियो क्लिप्स बनवून अपलोड करणे ही माझ्यासाठी नविन बाब होती. तरीही मी माझ्यापरीने शक्य तेवढा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आणि ऑडियो यामध्ये दर २५-३० सेकंदात टाईम डिफरन्स येत होता. एडिट करून आणि भरपूर मेहनत घेऊनही ध्वनी आणि चित्र यात शतप्रतिशत अ‍ॅक्यूरसी राखणे शक्य झाले नाही, त्याबद्दल दर्शक या बाबीकडे दुर्लक्ष करून मला माफ़ करतील अशी अपेक्षा बाळगतो.

———————————————————————–

———————————————————————–
अन्य व्हिडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

———————————————————————–

………………………………………………………………………………….

ब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण.

ब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण.

        स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे ऑन एअर प्रक्षेपण करण्याची सज्जता झाली असून आज रविवारी (२७ मार्च) सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझावर हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल.

चॅनेल : स्टार माझा TV मराठी
दिनांक : २७-०३-२०११
वेळ : सकाळी ९ वाजता

……………………………………………………..
त्या निमित्ताने दि. २६-०३-२०११ ला प्रसारीत करण्यात आलेली स्टार माझावर झलक.



मीमराठी बक्षिस समारंभ


मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट (
http://www.mimarathi.net 
यांच्या संयुक्त विद्यमाने “लेखन स्पर्धा २०१०” ही आंतरजालीय स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
अधिक माहिती या दुव्यावर मिळेल. http://www.mimarathi.net/node/5216
या स्पर्धेत “वांगे अमर रहे…!”
या ललित लेखाला पारितोषक मिळाले आहे.
………………………………………………
हा लेख खालील दुव्यावर वाचता येईल.

……………………………………………..

या स्पर्धेमधे २०७ प्रवेशिका पात्र ठरल्या होत्या.
स्पर्धेसाठी 
श्री. शंकर सारडा
श्री. प्रविण टोकेकर
श्री. रामदास
यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
……………..

१९ मार्च रोजी लेखन स्पर्धा २०१०-२०११ बक्षिसं समारंभ ठाणे येथे संपन्न झाला,

दिवस : १९ मार्च, २०११.
वेळ : ४.०० ते ७.०० संध्याकाळी.
पत्ता :
लक्ष्मी केशव मंगल कार्यालय, प्रताप सिनेमा समोर, कोलबाड रोड, खोपट, ठाणे (प).

…………………

लेखन स्पर्धा बक्षिस समारंभाची काही – क्षणचित्रे

(सर्व छायाचित्र श्री रोहन चौधरी आणि मी मराठी डॉट नेट च्या सौजन्याने.)



****


******

स्पर्धा विजयाच्या निमित्ताने…..!

मित्रांनो,
सप्रेम नमस्कार,


मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट यांच्या संयुक्त विद्यमाने
“लेखन स्पर्धा २०१०” ही आंतरजालीय स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.


या स्पर्धेचा निकाल जाहिर झाला असून
या स्पर्धेत “वांगे अमर रहे…!”
या ललित लेखाला पारितोषक जाहीर झाले आहे.
………………………………………………
हा लेख खालील दुव्यावर वाचता येईल.

……………………………………………..
स्पर्धेची अधिक माहिती येथे मिळेल.
http://www.mimarathi.net/node/5216

……………………………………………..


या स्पर्धेमधे २०७ प्रवेशिका पात्र ठरल्या होत्या.
स्पर्धेसाठी
श्री. शंकर सारडा
श्री. प्रविण टोकेकर
श्री. रामदास
यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
……………..
वांगे अमर रहे….!

                    मायबोली या संकेतस्थळावर मी “शेतकरी आत्महत्त्यांवर तज्ञांची मुक्ताफळे” हा लेख लिहीला होता. त्यावर आलेल्या एका प्रतिक्रियेवर खुलासा करतांना मी स्वतःचा अनुभव विषद केला. नंतर लक्षात आले की हा अनुभव म्हणजे एक स्वतंत्र ललित लेखच तयार झालेला आहे.
                   त्यापूर्वी मी कविता आणि वृत्तपत्रीय/स्फ़ुट लेखन वगैरे केले होते. परंतू कथा किंवा ललित स्वरुपाचे लेखन कधीही केलेले नव्हते. प्रतिक्रियात्मक स्वाभाविक अनुभव कथन केला आणि अनपेक्षीतपणे या ललित लेखाचा जन्म झाला. आणि हाच माझ्या आयुष्यातला पहिला ललितलेख ठरला.
                     आयुष्याच्या एका वळणावर भोगावा लागला भोगच आज मला एक पुरस्कार देवून गेला. मी आयुष्याच्या पुर्वाधात आयुष्याने माझ्या पदरात टाकलेले ”नकोनकोसे” क्षण मागे वळून पाहण्याचे कटाक्षाने टाळत आलो आहे.
                     पण आज या निमित्ताने मला वाटायला लागलेय की, याच क्षणांनी खरे तर माझे आयुष्य अधिक अनुभव समृद्ध केले असावे. मी काही लेखक नाही, लेखन कौशल्य आणि प्रतिभासंपन्नतेच्या बळावर मी ”वांगे अमर रहे…!” हा लेख लिहिला नाही. केवळ अनुभव कथन केला, जो शब्दश: खरा आहे. त्यातला एकही शब्द रंजित वा आगाऊ नाही. याउलट त्यातलाच बराचसा भाग लिहायचा राहून गेला आहे.
                   जेष्ठ गझलकार श्री श्रीकृष्णजी राऊत यांना माझ्यात काय दिसले, कोण जाणे पण त्यांनी मला मी माझे अनुभव लिहून काढावेत, असा आग्रह केला होता. माझ्या अनेक मित्रांनीही केला होता पण “मला मागे वळून पाहायचे नाही” या सबबीखाली मी ते टाळण्याचाच प्रयत्न केला.
                  आज मात्र मी द्विधा अवस्थेत आहे. लिहून काढावेत की नाही, संभ्रम आहे. लिहू नये याचे मुख्य कारण “मागे वळून पाहणे” माझ्यासाठी फ़ारच पिडादायक ठरणार आहे. पण माझ्याकडे काही अनुभव आहेत, जे सर्वसाधारणपणे दुर्मिळ किंवा कल्पनेबाहेरचे किंवा ऐकण्यात/वाचनात न आलेल्या स्वरुपाचे आहेत.
                   असो, यातूनही काहीतरी मार्ग निघेलच. आपल्याशी थोडेसे हितगूज करावेसे वाटले, म्हणून हा लेख प्रपंच.
                
                                                                                गंगाधर मुटे    
………………………………………………………………………………………
माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत.
………………………………………………………………………………………

पुरस्काराचा भुलभुलैय्या

पुरस्काराचा भुलभुलैया
 
                “स्टार माझा” तर्फे, घेण्यात आलेल्या ब्लॉग माझा-३ स्पर्धेत मला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपण माझेवर प्रेम व्यक्त करून अभिनंदन केलेत त्या बद्दल मी आपणा सर्वांचा अत्यंत ॠणी आहे, त्याबद्दल आपले सर्वांचे खूपखूप आभार. भविष्यातही आपणाकडून असेच उदंड प्रेम मिळत राहील ही अपेक्षा.  
               शक्यतो कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही. घेतलाच तर त्याचा निकाल कसाही लागो, नंबर येवो अथवा ना येवो, दोन्ही स्थितीमध्ये ना आनंद मानायचा ना दु:ख. अशी मानसिक तयारी करून तसा फार पूर्वीच निर्णय घेतला आहे मी. पण जेव्हा जेव्हा हा निर्णय अमलात यायची वेळ येते तेव्हा तेव्हा मात्र अगदी विचित्र परिस्थिती निर्माण होत असते. मी आणि माझे मन/शरीर या दोन स्वतंत्र ‘संस्था’ आहेत, याची पुरेपूर जाणीव होत असते. कारण मी जे ठरवतो त्यानुरूप वागण्यास मन अजिबात तयार नसते. ‘इंद्रियावर ताबा’ ठेवण्याचे निश्चय सामान्य माणसाला पाळणे तसेही कठीणच काम असते. किंवा असेही म्हणता येईल की, अशा तर्‍हेचे निश्चय करून ते अंगवळणी पाडणे, हे सामान्य माणसाच्या दृष्टीने महाकठीणच असते. फक्त या निमित्ताने मनावर थोडाफार ताबा मिळवता येऊन आचाराविचारावर थोडेफार नियंत्रण मिळवता येते, एवढाच काय तो आनंद.
                  या विषयावर काथ्याकूट करण्याचे कारण असे की, बर्‍याच कालावधीनंतर या तीन महिन्यांच्या कालावधीत मी दोन स्पर्धांमध्ये भाग घेतला. एका स्पर्धेत अपयश आणि दुसर्‍या स्पर्धेत यश. पहिल्या स्पर्धेत जेव्हा अपयश मिळाले तेव्हा थोडीफार नाराजी आलीच. प्रयत्न करूनही नाराजी जाईना. दु:ख मानायचे नाही, हा माझा आदेश माझेच मन स्वीकारेना. मी माझ्या मनाला परोपरी समजावण्याचा प्रयत्न केला, मनासमोर मी तर्‍हेतर्‍हेचे तर्क सादर केले, पण सारे व्यर्थ. मनाची उदासी जैसे थे. मग मनाच्या नाराजीचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एक बाब लक्षात आली की, नाराजी यश मिळाले की अपयश याबाबतची नसून परीक्षकाने मर्यादा ओलांडून निष्कारण आपल्या कलाकृतीला ‘कचरा’ ठरवून जाणूनबुजून हीनत्वाची वागणूक द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मनाच्या उदासीचे हे कारण मात्र पटण्यासारखे वाटले. मग पुन्हा मी माझ्या मनाला समजावण्याचा प्रयत्न केला.

मी : हे बघ मना, असल्या बारीकसारीक क्षुल्लक बाबींना एवढे महत्त्व द्यायचे काहीच कारण नाहीये.
मन : बारीकसारीक? क्षुल्लक? येथे चक्क उपमर्द होतोय, आणि तुला काहीच कसे वाटत नाही?
मी : हे बघ मना, तुला जे वाटते तेच खरे असेल कशावरून? त्याला दुसरी बाजूही असू शकते आणि ती खरी असू शकते.
मन : दुसर्‍याला हीन लेखने ही एक विकृती आहे, आणि तिचे समर्थन केले जाऊ शकत नाही.
मी : हे बघ मना, माणूस म्हटलं की चूकभूल होतच राहणार.
मन : नकळत किंवा अनवधाने घडते त्याला भूलचूक म्हणायचे असते. जाणीवपूर्वक केलेल्या कृतीला भूलचूक म्हणता येत नाही. अशी कृती क्षम्य सुद्धा असू शकत नाही.
मी : ते जाऊ दे, पण परीक्षकाबद्दल आणि श्रेष्ठ व्यक्तीबद्दल आदर बाळगायचा असतो, ही साधी बाब तुझ्या कशी लक्षात येत नाहीये?
मन : तीच तर खरी ग्यानबाची मेख आहे रे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. माणसांनाच काय, गाय हे जनावर असूनही तिच्याकडे आदराने बघायला शिकविलेना आम्हाला आमच्या संस्कृतीने. पण आदर राखूनही अवहेलनेचे शल्य तसूभरही कमी होत नाहीये.
                 अर्थातच कारण काहीही असो, आलेला प्रसंग पचवणे कठीण गेलेच. आपणच स्वमर्जीने केलेला निश्चय, आपल्यालाच पुरेपूर पाळता आला नाही, हे अधोरेखीत झाले.
 *   *   *
           प्रसंग दुसरा. आता विजेत्याच्या यादीमध्ये माझे नाव होते. मी निश्चयाप्रमाणे तसा मख्खच होतो. पण मनामध्ये मात्र आनंदाचा एक तरंग उठलाच होता. मात्र हा आनंदाचा तरंग “आपण जिंकलो” या भावनेतून अजिबात आला नव्हता. आपली दखल घेतली गेली, उपेक्षितांच्या भावनांना समजून घेणारेही आहेत, याबद्दल मिळालेल्या पावतीचा तो आनंदक्षण होता. त्यामुळेच यादीत नाव पहिले की शेवटले, याबद्दलही सोयरसुतक उरले नव्हते.
           मी काय लिहितो,कसे लिहितो, याचे मला भान आहे. माझे लेखन बहूसंख्यजनांना न रुचणारे, न पटणारे किंवा अनाकलनीय असू शकते, याची मला जाणीव आहे. कधीकधी तर क्रित्येकाच्या भावना दुखावणारे, तडाखे,चटके देणारे असू शकते, हेही ज्ञात आहे मला. पण नाईलाज आहे, वास्तव हे कटू असले तरी ते वास्तव असते, आणि मी ते टाळू शकत नाही. लेखन करतो म्हणून लेखक आणि कविता लिहितो म्हणून कवी, एवढंच माझं लेखक व कवी या शब्दांशी नातं. एरवी लेखक, कवीसाठी लागणारी योग्यता माझ्यात आहे किंवा नाही, मलाच संशय आहे. कारण मी कल्पनाविलासात फार काळ रमू शकत नाही. लोकांना रुचावे, दाद मिळावी, आपल्याला वाहवा मिळावी म्हणून त्या तर्‍हेने लेखन करण्याचे प्रयत्न मी करू शकत नाही.वाचक, रसिक, समिक्षक हा लेखकाच्या दृष्टीने देव असतो हे मान्य, पण त्यांचे फ़ाजिल लाड पुरविलेच पाहीजे, याबाबत मी सहमत होऊ शकत नाही. याउलट गरज असेल तेथे त्यांना दोन खडे बोल ऐकवण्याची कठोरता लेखकात असायलाच हवी, यावर मी ठाम आहे.लोकांचे निखळ मनोरंजन व्हावे एवढ्यासाठी मी लिहू इच्छित नाही. केवळ उपेक्षितांची दुर्लक्षित बाजू कागदावर चितारायचा प्रयत्न करणे, सिमित म्हणा की संकुचित म्हणा, पण एवढाच उद्देश माझ्या डोळ्यासमोर असतो, हे खरे आहे.
            उपेक्षितांची दुर्लक्षित बाजू कागदावर चितारायचा प्रयत्न करणारे आजवर खूप झालेत. पण इतिहास असे सांगतो की, या तर्‍हेचे व्रत घेतलेली बरीचशी माणसे मध्येच भरकटली आणि शेवटी देवाच्या आळंदीची वाट चुकून चोराच्या आळंदीला पोचलीत. आणि त्यामागच्या अनेक कारणांपैकी ‘पुरस्काराची अभिलाषा’ हे एक प्रमुख कारण आहेच आहे. एकदा का पुरस्काराची इच्छा मनात जागृत झाली की सर्वांना रुचेल, पसंतीस पडेल असे लेखन लिहिण्याकडे कल झुकलाच समजावा. मग कटू, कठोर, तडाखे देणारे, दुष्प्रवृतीवर घाव घालणारे लेखन जन्माला घालणारी लेखनी स्वत्वाच्या विनाशाकडे वाटचाल करायला लागलीच असे निर्विवाद समजावे. मग पुरस्काराच्या भुलभुलैयात लेखनीची धार कधी आणि कशी बोथट झाली, याचा उलगडा भल्याभल्यांना होत नाही.
           जी चूक इतरांनी केली, तीच चूक माझ्याकडून होऊ नये,एवढे बळ विधात्याने मला द्यावे, आणि या प्रवासात पुरस्कार वगैरे मिळाले तर आनंदच आहे, पण नाही मिळाले तरी त्यात खेद वाटण्यासारखे काहीच नाही, आपला मार्ग तेवढा महत्वाचा, तो भरकटू नये, हीच धारणा मरेपावेस्तोवर कायम रहावी, त्यात अंतर येऊ नये, एवढीच आंतरीक इच्छा आहे.   

                                                                           गंगाधर मुटे
,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,

संदर्भ :
पहिली स्पर्धा – एक काव्यलेखन स्पर्धा.
दुसरी स्पर्धा – स्टार माझा स्पर्धा.

“ब्लॉग माझा-३”-विजेत्यांचे अभिनंदन

ब्लॉग माझा-३”-विजेत्यांचे अभिनंदन

                                स्टार माझा या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनी तर्फे जगभरातल्या मराठी भाषिक ब्लॉग लेखकांसाठी नुकतीच “ब्लॉग माझा-३” ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत कुवैत ते कल्याण, इटली ते इंदापूर आणि न्यूयॉर्क ते नागपूर अशा विश्वाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी भाग घेतला होता. नुकतेच यास्पर्धेचे विजेते ब्लॉग जाहीर करण्यांत आलेले आहेत, त्या सर्व विजेत्यांचे मनपुर्वक अभिनंदन.
                           या विजेत्यांच्या यादीमध्ये “रानमोगरा – शेती आणि कविता” (http://gangadharmute.wordpress.com) या माझ्या ब्लॉगचाही समावेश आहे.

                        मराठी ब्लॉगच्या माध्यमातून मराठी भाषेचे वैश्विक पातळीवर संवर्धन आणि प्रसारण करण्यार्‍या ब्लॉगमधून उत्कृष्ठ आणि दर्जेदार ब्लॉग निवडीसाठी परीक्षक म्हणून लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, साप्ताहिक ‘साधना’) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सर्व परीक्षक मंडळी आणि स्टार टीव्हीच्या चमुचा मी आभारी आहे.


                        विजेते ब्लॉगर्स यांच्या कौतुक सोहळ्याच्या कार्यक्रमाचे एपिसोड रेकॉर्डिंग डिसेंबरमध्ये मुंबई येथे स्टार टीव्हीच्या स्टुडियो मध्ये होणार असून या कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम स्टार माझा टीव्हीच्या खास एपिसोडमध्ये प्रसारीत केला जाणार आहे.