कापला रेशमाच्या सुताने गळा

.
.
——————————————————–
कशी दाद देऊ मित्रा, तुझा विकासाचा आलेख वेगळा
ऐश्वर्य तुझे सात मजली, तुला गालिच्यांचा लळा
आरसी – ओसी मध्ये तुझी करंगळी खेळते, पण;
त्या तिथे गावी बापास मिळत नाही कोरडा जोंधळा
———————————————————
.
.
कापला रेशमाच्या सुताने गळा
.

जाणवू ना दिल्या वेदना ना कळा
कापला रेशमाच्या सुताने गळा

घेतला आळ नाही निसर्गावरी
भोगुनी सोसले मी तडाखे-झळा

साथ नाही सुखाचा खरे हे जरी
का तुझ्या वाचुनी मी लुळापांगळा?

राहतो मी कुठे, नेमका कोण मी?
सापडेना खुणा, मी कसा बावळा?

भाग ओसाड का घाम गळतो जिथे?
वाट चुकलाय पैसा-टका आंधळा

झेप घेण्यास तू वेळ लावू नये
मांडला आज आहे इथे सापळा

रंग खात्रीस पक्का, फिका ना पडे
वर्ण भाग्यात माझ्या निळासावळा

मार्ग सारेच धुंडाळतो कैकदा
चालण्याला तरी शोधतो वेगळा

चित्त शाबूत असणे ”अभय” चांगले
पोळलेला जरी भावनांचा मळा

                               - गंगाधर मुटे
—————————————
अवांतर – एक विडंबन

मै खंजर तो नही
मगर ये घोरफडी
जबसे मैने तुझको काटा
खंजरी हो गयी….॥
—————————————

सुप्तनाते

.
सुप्तनाते
.
तुझे आणि माझे मुळी सख्य नाही, तरी ओढ का वाटते या मना
कुणी निर्मिले हे असे सुप्तनाते, जरा तू खुलासा मला सांगना

तुला मान्य नाहीच अस्तित्व माझे, हिशेबी तुझ्या मी किडामाकुडा
तुझे वागणे तूज लखलाभ मित्रा, तुला मोक्ष देवो अहंभावना

तुला जाण नाही, मला भान नाही, भटकलाय संसारगाडा कुठे?
धुरा ताणलेले जसे बैल दोन्ही, कुणीही कुणाला जुमानेचना

चला वापरा एकदा आणि फेका, हवी ती खरेदी नव्याने करा
इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ, हृदय भासते ‘मेड इन चायना’

किती ग्रंथ वाचून मुखपाठ केले, किती ऐकतो रोज पारायणे
जुमानेच नाही कशालाच थोडी, नियंत्रीत होईचना वासना

कसा आज रस्ता दिशाभूल झालो, निघालो कुठे अन् कुठे पोचलो
कसोटीत उद्दिष्ट हरवून गेले, “अभय” व्यर्थ गेली तुझी साधना

                                                               - गंगाधर मुटे
——————————————————————–

जगणे सुरात आले

जगणे सुरात आले

वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले

चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले

दुखवू नये कधीही मनभावना कुणाची
सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले

पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले

मतला, रदीफ, यमके, शब्दात गुंफताना
झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले

का पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा?
एकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले

कसला ‘अभय’ कवी तू? रचतोस हे मनोरे
जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!

                                          - गंगाधर मुटे
——————————————–

टुकारघोडे! (हझल)

टुकारघोडे! (हझल)

गाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे टुकारघोडे हजार आहे

कशी बघा चालते कचेरी, अशी जशी की दुकानदारी
अनाथ सोडून कायद्याला, विधानमंडळ फ़रार आहे

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला
मुरूम गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे

गमावतो ना कधीच संधी सफ़ेद कुत्रा पिसाळलेला
डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे

कुठून आणू नवीन गजरा, दुकान शोधू कुठे नव्याने?
सरून पर्याय सर्व गेले, जुनीच देणी उधार आहे

परंपरा-वंश लाभ ज्यांना, इथे तयांनाच ’अभय’ आहे
फ़िरोजघरचे गिधाड-कुत्रे, नेमून येथे हुशार आहे

                                                     - गंगाधर मुटे
—————————————————

अस्तित्व दान केले – लोकमत दिवाळी अंक

अस्तित्व दान केले – लोकमत दिवाळी अंक २०११

असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले

मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले

हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले

चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले

वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले

इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
निष्कपट भावनेला दैदिप्यमान केले

जळले न रोज जेव्हा, चुल्ह्यातले निखारे
तेव्हा “अभय” भुकेला, धारिष्ट्यवान केले

                                - गंगाधर मुटे
————————————————

              लोकमत दिवाळी विशेषांक
              
             मध्ये प्रकाशीत कविता/ गझल
————————————————

क्षण एक पुरे जगण्यास खरा : पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११

क्षण एक पुरे जगण्यास खरा

जगणे कसले शतवर्ष नरा?
क्षण एक पुरे जगण्यास खरा

लपवून व्यथा रडतोय मनी
दिसतोच सदा मुखडा हसरा

जगणेच नको असले तसले
परसात पडून जणू कचरा

मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा

श्रमतो, दमतो, शिणतो पुरता
परिहार जणू जुळता नजरा

दिसतात इथे जन सज्जन हे
अपुलाच स्वभाव नसेल बरा

रुळताच मनी भलतेसलते
पुसतात कशास हवा नवरा

वरदान मिळो “अभया”त जगा
दररोज घरात जणू दसरा

                           - गंगाधर मुटे
———————————-
पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११

पुण्यनगरी
प्रकाशित गझल
———————————-
वृत्त : तोटक    रदीफ : गैरमुरद्दफ
———————————-

हात घसरतो आहे


हात घसरतो आहे

अल्याड डोंगर पल्याड खाई, डचमळतो मी मधात आहे
रुतेचना ही नखे कुठेही, सदा घसरतोच हात आहे

कुटाळकीच्या समोर सज्जन समाज सारा हरून गेला
तसाच मीही क्रमाक्रमाने सदैव खातोच मात आहे

बरेच काही लिहून गेलो, कुठे दखल घेतलीय माझी?
जरी तयांनी जरा खरडले, तुफान चर्चा जगात आहे

खुशाल करती टवाळखोरी बघून कोणास पाठमोरा
समोर येता मुखावरी मुख हसून हॅलो प्रघात आहे

किती शहाणे, किती दयाळू, घडीव आहेत राज्यकर्ते
विरोधकांनो बघा जरासे हवेवरी का जकात आहे?

’अभय’ पुन्हा तू नकोच देऊ, तुझे असूदे तुझेच पाशी
मुळीच नाही गरज कुणाला समस्तजन हे सुखात आहे

                                        - गंगाधर मुटे
——————————————————–
                    पूर्वप्रकाशित गझल
                
            मायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११

——————————————————–

ते शिंकले तरीही…..!


ते शिंकले तरीही…..!

आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते

सोकावलाय येथे काळोख माजलेला
घनघोर रात्र कोठे, कोठे प्रभात होते

का लोळतात पायी सिंहासने तयांच्या?
अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?

आक्रोश शोषितांचे ना उग्र रूप घेते
आक्रंदणे तयांची घरट्यात आत होते

जुळली सतार नव्हती बेसूर जीवनाशी
कसली स्मशानयात्रा तालासुरात होते?

दारिद्र्य पोसताना, गरिबीस राखताना
वाट्यात तज्ज्ञ अभये का एकजात होते?

                                      - गंगाधर मुटे
————————————————
                     पूर्वप्रकाशित गझल
                  
                       मोगरा फ़ुलला
                 ई दीपावली अंक २०११
————————————————

नव्या पिढीतील प्रतिभेचा शोध

नव्या पिढीतील प्रतिभेचा शोध
गझल सागर प्रतिष्ठानचा उपक्रम

गझल … भावनांच्या अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम … अरबी – फार्सी – उर्दू प्रवास करीत आलेली गझल प्रादेशिक भाषांमध्येही रुजली … बहरली … मराठी मातीत फुललेल्या या आशयघन काव्यप्रकाराचे कविवर्य माधव ज्युलियन ते कवी सुरेश भट व इतर … असे अनेक टप्पे आहेत. या टप्प्यानंतरची गझल नेमकी आहे कशी याचा शोध गझल सागर प्रतिष्ठान घेणार आहे.

मराठी गझलने ९० वर्षांच्या वाटचालीत अनेक अडथळे, विरोध पचवत रसिकांच्या हृदयापर्यंत पोचून मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. मराठी गझल लिहिणाऱ्या शायरांच्या गझला लोकांपर्यंत पोचण्यासाठी सुरेश भटांनी काफला हा प्रातिनिधीक गझलसंग्रह प्रकाशित केला. त्यानंतर गझल सागर प्रतिष्ठानने कारवा, विदर्भाची मराठी गझल, स्पर्शांकुर ( अंधांसाठी ब्रेल लिपीसह ) असे संग्रह प्रसिद्ध केले. याशिवाय गझलकार, गझलगायक आणि अभ्यासकांसाठी गझलविश्व नावाची सूची प्रकाशित केली.

प्रमाणभाषा आणि बोलींतील गझल

१९६० नंतरच्या गझलकारांवर भटांचा मोठा प्रभाव आहे. प्रमाण मराठी भाषेबरोबरच कोंकणी, वऱ्हाडी, गोंडी, अहिराणी या बोली भाषांमध्येही गझलेने दमदार पाऊल टाकले आहे. भटांच्या निधनांनंतर या नवीन प्रवाहाला सामावून घेणारी गझल रसिकांपर्यंत पोचण्यासाठी एक प्रातिनिधिक गझल संग्रह तयार करण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन गझल सागर प्रतिष्ठानने हा प्रकल्प हाती घेतला आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी दिली. आगामी अखिल भारतीय मराठी गझल साहित्य संमेलनात हा संग्रह प्रसिद्ध होणार आहे.

मुंबई, महाराष्ट्रासह ठिकठिकाणी गझल लिहिणाऱ्यांनी आपल्या दहा तंत्रशुद्ध आणि आशयघन गझला, पोसपोर्ट साईज फोटो, नाव, जन्मतारीख, पत्ता, फोन, इमेल, छंद, साहित्यिक वाटचाल असा तपशील २० ऑक्टोबर २०११ पर्यंत पाठवावा.
पत्ता :
भीमराव पांचाळे,
गझल सागर प्रतिष्ठान,
२०२, नेहा सोसायटी,
प्लॉट क्र . १०४,
गोराई – २ बोरिवली (प)
मुंबई – ९१